Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट २६, २०१५

अशी गर्दी पुन्हा व्हावी!

देवनाथ गंडाटे 
अशी गर्दी पुन्हा व्हावी, असे मला वाटते. पण, चांगल्या कामासाठी. अनेक तरुण मुलं अल्प पगारावर पत्रकार म्हणून काम करतात. कुटुंब पोसता येईल, इतकीदेखील रक्कम हाती येत नाही. कधी उसनवारी, तर कधी पोट मारून ही पोरं काम करतात. शिक्षण घेऊनही नोकरी न लागल्यानं या बातम्यांच्या ते धंद्याकडे वळले आणि कधी परत जाणार नाहीत, अशा दलदलीत येवून सापडलेत. आयुष्यभर दुसऱ्यांच्या पगारासाठी, किमान वेतनासाठी, तर कधी सेवानिवृत्ती, महागाई भत्ता, तर नक्षलभत्त्याच्या बातम्या मोठमोठ्या प्रकाशित करतात. पण, स्वत:च्या पगाराची अन्‌ सुविधांची मागणी कोणत्या पेपरात प्रकाशित होणार? की आयुष्यभर बातमी प्रकाशित करणे किंवा प्रकाशित न करण्याचेच पैसे घेत राहणार? जग स्मार्ट झालाय. ज्यांच्याकडे मोबाइल आला. तोदेखील पत्रकार झाला. तो आपली व्यथा सहजपणे आता जगापुढे मांडू शकतो. त्याला वाचकही मिळाला. पत्रकारितेचे विश्‍व बदलत आहे. बातम्यांची मार्केटींग, कामाची मार्केंटीग सुरू झाली. सामान्य माणूसदेखील स्मार्ट फोनच्या आधारे बातमी विकू लागला आहे. त्यामुळे सांगावेसे वाटते "जग बि घडलाय, तुम्ही बी घडाणा'. चंद्रपुरात निघालेला मोर्चा उर्त्स्फुत होता. अशी गर्दी पुन्हा व्हावी, ती आपल्या न्यायहक्‍कासाठी....

श्रमिक
पत्रकार विरुद्ध एल्गार
बापूजी ने कहा घर छोड दो, मां ने कहा पारो को छोड दो और पारो ने कहा दारू को छोड दो, हे वाक्‍य ऐकले की आठवतोय देवदास. मद्यपींना अनेक लेखकांनी वेगवेगळी नावे दिली. राम गणेश गडकरींनी त्याला तडीराम म्हटले. आमच्या गावाकडे हे दोन्ही शब्द नाहीत. पण, बेवडा म्हणतात. काहीजण दारुडे संबोधतात. शब्द काहीही असोत. नशा डोलणारीच असते. म्हणून देवदासमध्ये डोला रे... हे गाणं हिट झालं. पण, या दारुमुळे सारे बिघडले, तर काहींचे घडले. पिणारे, न पिणारे देखील नशेबद्दल मनसोक्त बोलतात. ज्यांनी आयुष्यात दारु प्राशन केली नाही, ते देखील दारुची नशा वाईट आहे, असे सांगतात. प्रत्येकांचा अनुभव वेगळा असलातरी जे सांगायचे ते सांगतात. देवदास हा मद्यपी. त्याला दारुपासून परावृत्त करण्यासाठी खटाटोप करणारी पारो. हे कथानक जरी चित्रपटातील असलेतरी परिणाम खऱ्याखुऱ्या आयुष्यातही दिसते. याच दारुपासून मुक्तता मिळविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीची मागणी रेटून धरल्यानंतर ती पूर्ण होईपर्यंत लढा देणाऱ्या श्रमिक एल्गारने "जया'चे श्रेय घेतले. ज्यांनी परिश्रम घेतले त्यांनी श्रेय घेतले. पण, आता दारुबंदीच्या पाच महिन्यांनी विदारक स्थिती निर्माण झाली. पहिल्या महिन्यात सिमारेषेवर झडती व्हायची. दारु पकडली जायची. कारवाई व्हायची. अवैध दारु नेणाऱ्यांत भिती निर्माण झाली. पण, आता कुणाला विचारल्यास, "भाऊ कोटी भेटते का गा.' तो सहज सांगतो, भेटत्ते काज्जी न. पण, एका निपले तिनशे रुप्पये. साऱ्यांचेच व्यवस्थित सुरू आहे. पण, ते लपून. आता ही दारु कोणी पकडून द्यावी आणि कोणाला पकडून द्यावी, हा प्रश्‍न आहे. कारण, ज्यांना पकडून दिली, ते गांधी नोट खिशात टाकून मोकळे होतात आणि ज्यांची पकडून दिली ते वैर करतात. मारण्याची धमकी देतात. पाहून घेण्याची भाषा करतात. मग, कशाला उगीचच कटकट.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून श्रमिक पत्रकार विरुद्ध श्रमिक एल्गार असा वाद रंगतोय. मला त्यात खोलवर बोलायचे नाही. पण, दोन्ही संघाना एकत्र केल्यास "श्रमिक पत्रकारांचा एल्गार' असा एकवाक्‍य होतो. वृत्तपत्रात बातमी छापून आली. ती खोटी आणि चुकीची असल्याचा एल्गारचा युक्तीवाद आणि बातमीवर पोलिसात तक्रार का दिली, हा पत्रकारांना आलेला राग. या वाद आणि रागातून मुकमोर्चा निघाला. जिल्ह्यातील शेकडो गावचे पत्रकार जिल्ह्याच्या ठिकाणी आले. खिशाला काळ्याफिती लावल्या. एल्गारविरुद्ध नारे दिले. चौथ्या स्तंभाला असलेल्या अधिकाराचा वापर वार्ताहराने केला आणि नागरिक म्हणून असलेला अधिकार एल्गारने वापरला. "कोण बरोबर, कोण चुक', हे आपणच ठरविले पाहिजे. जिल्ह्यात नवे पोलिस अधीक्षक आले. दारुबंदीवर आळा घालणे हा एकच उद्देश नव्या पोलिस अधीक्षकांना येथे आणण्याचा होतो, हे छातीठोकपणे सांगणे चुकीचे आहे. भलेही दारुबंदीचे आव्हान त्यांच्यापुढे होते. पण, केवळ दारु हाच एकच गुन्हेगारीतील विषय नाही. दारुबंदी झाल्यानंतरही दारु विकली जात असेलतर ज्या ज्या लोकांनी या यशस्वी लढ्याचे श्रेय लाटले असेल हा त्यांचा नाकर्तेपणा आहे का? की त्यांनीही आता दुसऱ्यावर खापर फोडावे.


बोगस पत्रकारांचा सुळसुळाट कधी थांबणार?
पत्रकार असल्याचे सांगून अधिकारी, कर्मचारी, तर कधी राजकीय पुढाऱ्याकडून पाचशे रुपये देखील घेणाऱ्या पत्रकारांची संख्या गावात कमी नाही. वस्तुस्थिती बघितली तर महिन्याला चारही अंक न काढणारा पत्रकार (स्वत:ला मालक समजून घेणारे) राज्यशासनाचा अधिस्वीकृती पत्र घेऊन फिरतो. एसटी बसमध्ये मोफत प्रवास करतो (आरक्षित आसनावर). विश्रामगृहात खोली बूक करतो आणि वाट्टेल ते रंगेल धंदे करतो, अशा बोगस पत्रकारांचा सुळसुळाट कधी थांबणार आहे. अशा निर्लज्ज प्रकारामुळे चांगल्या माणसांची मान शमनेनं खाली जात आहे, त्याचे काय? 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.