Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट २९, २०१५

अपंग मुलीला "शौचालय'ची रक्षाबंधन भेट

चंद्रपूर : दोन्ही पायांनी अपंग असलेल्या एका मुस्लीम मुलीची व्यथा ऐकून चंद्रपूर महापालिकेचे माजी उपमहापौर आणि शिवसेना पदाधिकारी संदीप आवारी यांनी तिला स्वखर्चाने शौचालय बांधून दिले. एका मुस्लिम बहिणीचे खऱ्या अर्थाने रक्षण करून "या' भावाने रक्षाबंधनाची आगळीवेगळी भेट दिली आहे.

येथील इंदिरानगर भागात रुकसाना गनिशेख ही विधवा महिला मागील 22 वर्षांपासून वास्तव्यास आहे. दोन मुलींचा विवाह झाल्याने त्या सासरी आहेत. तर, उर्वरित दोन मुली आणि एक मुलगा तिच्याजवळ आहेत. कमरजहॉं.या 38 वर्षांच्या मुलीला जन्मापासूनच अपंगत्व आहे. त्यामुळे या मुलीच्या सर्व विधी आईलाच कराव्या लागत आहेत. या मुलीसाठी घरी शौचालय बांधावे असे वाटत होते. परंतु, घरची आर्थिक विवंचना आड येत होती. मुस्लिम समाजासाठी शौचालयाची कोणतीही योजना नसल्याचे सांगून सर्वांनीच हात वर केले.
पाच महिन्यांपूर्वी ही वृद्ध महिला पुन्हा महापालिकेत गेली. आयुक्तांना भेटली. पण नकारच मिळाला. त्यावेळी तेथे उपमहापौर असलेले शिवसेनेचे नेते संदीप आवारी पोहोचले. आयुक्तांनी त्यांना ही अडचण सांगितली. वृद्ध महिलेनेची करुण कहानी ऐकताच आवारी यांचं मन द्रवले. लगेच त्या महिलेला शौचालय स्वखर्चाने बांधून देण्याचा शब्द दिला. एरवी राजकारण्यांचा शब्द म्हणजे हवेतील तीर असतात. पण आवारी यांनी दिलेला शब्द पाळला. लगेच कंत्राटदारांशी संपर्क साधून बांधकामाला सुरवात करण्यास सांगितले. आज हे शौचालय बांधून तयार झाले आहे. त्यामुळे रुकसाना अतिशय भावुक झाली आहे. एका गरीब बहिणीच्या मदतीला देवदूत धावून आल्याची भावना त्यांच्या मनात आहे.
जातीपातीची बंधनं तोडून केवळ सामाजिक दायित्वाच्या भावनेतून केलेले आवारी यांचे हे कार्य निश्‍चितच प्रेरणादायी आहे. रक्षाबंधनाच्या औचित्यावर एका भावाने दिलेली ही भेट या निर्धन बहिणीसाठी लाखमोलाची ठरली. तिने आवारी यांना राखी बांधून आपली कृतज्ञता व्यक्त केली. मदत करणारे हात हिंदूंचे की मुस्लिमाचे, हे आपण पाहात नाही. मदत करणारा हा नेहमीच धर्माच्या पलीकडचा असतो, यावर या बहिणीचा विश्‍वास आहे. धर्मनिहाय गणनेवरून देशात विखारी चर्चा सुरू असताना या घटनेने त्यावर विराम घालण्याचा प्रयत्न केला आहे. एका छोट्याशा शहरातील ही छोटीशी घटना असली, तरी त्याचे मूल्य आणि महत्त्व सर्वव्यापी असेच आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.