Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून ०६, २०१५

पर्जन्यमानाची माहिती एसएमएसद्वारे

चंद्रपूर : जिल्हा प्रशासन यंदापासून जनतेला पर्जन्यमानाची माहिती एसएमएसद्वारे देणार आहे. यंदाचा मान्सून थोडा विलंबाने दाखल होणार असल्याने शेतकर्‍यांना शेती हंगामाचे नियोजन करता यावे, यासाठी जिल्हा प्रशासन हा उपक्रम राबविणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
खरीप हंगामाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.पी. कल्याणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अण्णासाहेब हसनाबादे, जिल्हा उपनिबंधक कौशडीकर व कृषी विकास अधिकारी देशमुख यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकर्‍यांनी पेरणीची घाई न करता निश्‍चित पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी. भात, सोयाबीन, कापूस, तुर, ज्वारी व इतर असे ४ लाख ६७ हजार ६८0 हेक्टर प्रमुख पिकाखाली क्षेत्र आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरी ८३९ मि.मी. पाऊस झाला होता. यावर्षी पावसाचे आगमन थोडे उशिरा असल्याचा अंदाज आहे.
शेतक-यांनी पर्जन्यमानाची माहिती घेण्यासाठी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.आयएमडी.जीओव्ही.आयएन या संकेतस्थळाचा वापर केल्यास पर्जन्यमानाची अद्ययावत माहिती प्राप्त होऊ शकते. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय व कृषी विभागाच्या कंट्रोल रुमशी संपर्क साधल्यास माहिती मिळेल, असेही यावेळी सांगण्यात आले.
उत्पादकता वाढविण्यासाठी सोयाबिनचे ९६५0 हे नवीन वाण आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, सर्व बियाणांची मिळून ९५ हजार २४३ क्विंटल बियांणाची मागणी आहे. ३१ हजार ९0५ क्विंटल बियाणेसाठा प्राप्त आहे. मे अखेर खताचे आंवटन २९ हजार ८00 मेट्रिक टन असून ३६ हजार ४९२ मेट्रिकटन खतसाठा उपलब्ध आहे.
जिल्ह्यात बियाणे व खताची उपलब्धता मुबलक प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवारमध्ये जिल्हयात १ हजार ५२५ कामे सुरु असून ९९३ कामे पूर्ण झाली आहेत. आठ विविध विभागामार्फत जलयुक्त शिवारची कामे केली जात आहेत. पाणी टंचाईचा गेल्या वर्षीचा आठ कोटीचा आराखडा होता. मे अखेर चार कोटीचा आराखडा तयार करुन मंजुरी दिल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.