Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २४, २०१४

जातीय समीकरणामुळे पक्षाची बंधने तुटणार!

महेंद्र ठेमस्कर
चंद्रपूर 
(पुण्यनगरी )
...................

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात यावर्षी पहिल्यांदाच जातीय समीकरणावर निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट चित्र असून पक्षाची बंधने तोडून काही राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते 'आता अस्मितेचा प्रश्न निर्माण झाल्याने साहेबांना जिंकून आणावेच लागेल', अशी कणखर भूमिका घेऊन कामाला लागल्याने सर्वांच्याच नजरा याकडे लागल्या आहेत. फुले, शाहू, आंबेडकर, टिळक, आगरकर यासारख्या थोर महात्म्यांच्या पुरोगामी म्हणवणार्‍या राज्यात जातीय समीकरणातून निवडणुकांची बेरीज-वजाबाकी केली जात असल्याने भविष्यकाळ कुठे आणि कसा शोधायचा? असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण होणार आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून काँग्रेसने या मतदारसंघात आतापर्यंत कधीच कुणबी समाजाचा उमेदवार उभा केला नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी जवळीक असल्याने पालकमंत्री संजय देवतळे यांच्या रूपाने पहिल्यांदाच या समाजाचा उमेदवार टाकण्यात आला. आम आदमी पक्षानेसुद्धा अँड़ वामन चटप यांना उमेदवारी देऊन डाव मांडला. संजय देवतळे आणि वामन चटप हे बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाचे प्रतिनिधीत्व करीत असले तरी यांच्या पोटजाती वेगवेगळ्या असल्याने त्याचे चटके दोन्ही उमेदवारांना बसणार आहेत. संजय देवतळे हे खैरे कुणबी तर अँड़ वामन चटप हे धनोजे कुणबी समाजाचे आहेत. या लोकसभा मतदारसंघात धनोजे कुणबी समाजाची मतदारसंख्या पाच-साडेपाच लाख तर खैरे कुणबी समाजाची संख्या साधारणत: सव्वादोन-अडीच लाख असल्याचे सांगितले जाते. मराठा कुणबी समाजाचे मतदारही दीड लाखाच्या आसपास आहेत. या भागातील खैरे कुणबी समाज एकसंघ असून कोणत्याही निवडणुकीमध्ये आपल्या समाजाच्या उमेदवाराला झाडून मदत करीत असतो. मात्र, बहुसंख्य असलेला धनोजे कुणबी समाज हा आतापर्यंत कोणत्याच निवडणुकीत एकसंघ राहिला नाही. या समाजाची मते सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडे विभागली जात होती. महत्त्वाचे म्हणजे, मराठा कुणबी समाज हा नेहमीच खैरे कुणबी समाजाच्या बाजूने उभा राहिला आहे.

आमदार आणि पालकमंत्री म्हणूनही देवतळे यांची कारकीर्द निराशाजनक राहिली असली तरी या निवडणुकीमध्ये त्यांचा समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे दिसतो. वरोरा विधानसभा मतदारसंघात देवतळे यांची मदार समाजाच्या भरवशावरच आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये सहा पट अधिक ताकद लागत असल्याने देवतळे यांच्यासमोरही जातीय समीकरणाचा मुद्दा उभा राहणार आहे. देवतळेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता धनोजे कुणबी समाजाच्या लोकांमध्येसुद्धा 'स्पिरीट' चढले आहे. त्यामुळे पक्षाची बंधने तोडून विविध राजकीय पक्षात काम करीत असलेले नेते आणि कार्यकर्ते आपापल्या समाजाच्या उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. या दोन्ही समाजाचे नेते आणि कार्यकर्ते काँग्रेस आघाडी आणि भाजप महायुती, आम आदमी पक्षामध्ये विखुरलेले दिसत असले तरी आता प्रश्न जातीचा आहे. त्यामुळे साहेबांना निवडून आणण्याची जबाबदारी प्रत्येकावर आली असल्याचे सांगत फिरत आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.