Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी ०१, २०१४

शहरातील कुत्रे जंगलात सोडण्यामुळे चंद्रपूरचे वन्यजीव धोक्यात

चंद्रपूर शहरात गेल्या काही वर्षांपासून अनेक वार्डातील गावठी कुत्रे पकडून नजीकच्या जंगलात सोडण्याची महानगरपालिकेची भूमिका आता वन्यजीव प्रेमींच्या आक्षेपामुळे अडचणीत येताना दिसतेय.
गेल्या काही वर्षांपासून शहराबाहेर मुल रोड च्या जंगलात कुत्रे सोडण्याचे प्रकार येथील नगर पालिकेद्वारे सुरु होते. लोहारा या गावाजवळ सोडलेले बरेच कुत्रे ४-५ कि. मि. अंतर कापून बंगाली क्याम्प परिसरात परत येत होते. त्यामुळेच कि काय आता हे पकडलेले कुत्रे आणखी पुढे घनदाट जंगलात सोडणे सुरु झाले आहे.
चंद्रपूर जवळचे संपूर्ण जंगल संरक्षित वन्य प्रजातींसाठी ओळखल्या जाते. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या या जंगलाच्या बफर झोन मध्ये समाविष्ट केलेले हे जंगल वाघ व बिबट्या यांच्या सांचारासाठी प्रसिद्ध आहे. वारंवार वन्यजीवांचे दर्शन होण्यामुळे ताडोबा व लगतच्या जंगलात फिरण्यासाठी वर्षभर देशभरातून पर्यटक येतात. अश्यामध्ये स्थानिक महानगर पालिकेला या वन वैभवाची किंमत दिसत नाही असेच म्हणावे लागेल.

जंगलामध्ये कोणताही नवीन प्राणी किंवा प्रजाती सोडण्यासाठी केंद्रीय वन व पर्यावरण खात्याकडून मान्यता लागते. संपूर्ण अभ्यासा अंतीच असे निर्णय वन विभागातर्फे घेण्यात येतात. दुसरीकडे पकडलेले किंवा आजार व दुखापती मधून बरे झालेले वन्य प्राणी हे देखील जंगलात सोडताना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची तपासणी केली जाते. जंगलातील गावांमध्ये पाळीव जनावरांना देखील वन विभागातर्फे लसीकरण करण्यात येते. कुठलाही संसर्गजन्य आजार या प्राण्यांमुळे पसरू नये यासाठी वन विभाग इतकी खबरदारी घेत असताना महानगर पालिकेची यंत्रणा बिनबोभाट पकडलेले कुत्रे जंगलात सोडत आहे.
या संदर्भात येथील स्थानिक पर्यावरण संस्था ग्रीन प्ल्यानेट सोसायटीने विभागीय वन अधिकारी व ताडोबाचे क्षेत्र संचालक यांच्याकडे आज तक्रार केली. संस्थेचे पदाधिकारी डॉ सचिन वझलवार व डॉ योगेश्वर दुधपचारे यांनी चंद्रपूर वन विभागाचे विभागीय वनाधिकारी श्रि. चौधरी यांची भेट घेवून संबधित प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी दिलेल्या लेखी तक्रारीमध्ये शहरातील कुत्रे जंगलात सोडल्याने कुत्र्यांमधील संसर्ग जन्य आजार वन्य जीवांमध्ये पसरण्याची भीती व्यक्त केलेली आहे. सध्या जगभरात canine distemper virus (CDV) नावाचा विषाणू पाळीव प्राण्यांमुळे वन्य जीवांमध्ये पसरण्याची अनेक उदाहरणे व अभ्यास सुरु आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास कुठलाही उपाय उपलब्ध नाही. शिवाय गावठी कुत्रे हे वन्य प्राण्यांचे नैसर्गिक खाद्य नसल्याने पुढे जाऊन हे बिबटे शहराच्या बाहेरील भागाकडे कुत्र्यांसाठी भक्ष्य म्हणून आकर्षिले जातात.
या तक्रारीवर कारवाई करताना विभागीय वन अधिकाऱ्यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चा भंग होत असल्याने जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.