Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जानेवारी १५, २०१४

पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे निधन

प्रख्यात कवी, विचारवंत आणि दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज (बुधवारी) पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या ढसाळ यांच्यावर बॉम्बे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ढसाळ यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातून तीव्र दु:ख व्यक्त होत आहे. गेली अनेक वर्षे नामदेव ढसाळ मायस्थेनिया ग्रॅव्हीज या दुर्धर आजाराने ग्रस्त होते. त्या आजाराशी झुंजतच त्यांची वाटचाल सुरू होती. अलीकडे त्यांना कॅन्सरचा आजारही जडला होता. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार होत होते. सोमवारी प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यात यश आले नाही. ढसाळ यांचे पार्थिव उद्या (गुरुवारी) सकाळी ११ वाजता आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर चैत्यभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. *अल्पपरिचय* ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे लहाणपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे मुंबईतील गोलपीठा या रेड लाइट भागात त्यांचं बालपण गेलं. डॉ. आंबेडकरांवर नितांत श्रद्धा असलेले नामदेव ढसाळ ऐन तारुण्यातच दलित चळवळीकडे आकर्षित झाले. काव्य असो, गद्य असो की वृत्तपत्रांतील स्तंभलेखन असो, आपल्या साहित्यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार तितक्याच प्रखरपणे मांडण्याचे काम ढसाळ यांनी केले. अनियतकालिकांच्या चळवळीतही ते अग्रभागी होते. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.