चंद्रपूर : चौदा डिसेंबरला आयोजित प्रदूषणविरोधी महारॅलीसाठी येत्या रविवारी (ता. एक) आयएमए हॉल, सरदार पटेल महाविद्यालयासमोर, गंजवॉर्ड, चंद्रपूर येथे सायंकाळी पाच वाजता बैठक आयोजित केल्याची माहिती चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंदडा यांनी दिली.
प्रदूषणाविरोधात येत्या १४ डिसेंबरला गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली काढण्यात येणार आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी अनेकदा कृती आराखडा तयार करण्यात आला. मात्र, ठोस उपाययोजना न झाल्याने प्रदूषण कमी झाले नाही. जिल्ह्यात वाढत चाललेले उद्योग, वीजकेंद्र, वाहनांचा वाढता उपयोग, कोळसा खाणी, अशा अनेक कारणांमुळे प्रदूषण सतत वाढतच आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार, हृदयरोग, चर्मरोग, डोळ्यांचे आजार, कर्करोग, टीबी या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर चर्चा करण्यासाठी आणि महारॅलीची दिशा ठरविण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. यात नागरिक, डॉक्टर, लोकप्रतिनिधी, वकील, विद्याथ्र्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. गोपाल मुंदडा, सुरेश चोपणे, रुंगठा, कांबळे, प्रा. दूधपचारे, पप्पू देशमुख, अॅड. शाकीर, सुबोध कासुलकर यांनी केले आहे.