Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर १९, २०१३

माजी नगराध्यक्ष सुनंदा आत्रामला जन्मठेप

डॉ. विजय वडस्कर खूनप्रकरण - २८ एप्रिल २00६ ची काळरात्र 

चंद्रपूर- एप्रिल २00६ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वतरुळात खळबळ उडविणार्‍या नगरसेवक डॉ. विजय वडस्कर खूनप्रकरणी बल्लारपूर येथील काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष सुनंदा आत्रामला बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग- १ तथा विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर तिचा पुतण्या खजांजी आत्राम याला खुनाच्या प्रकरणातून मुक्त करून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
२८ एप्रिल २00६ ची रात्र बल्लारपूर नगरपालिकेचे तत्कालीन उपाध्यक्ष डॉ. विजय वडस्करसाठी काळरात्र ठरली. बल्लारपूरच्या माजी नगराध्यक्ष सुनंदा आत्रामच्या घरी विजय वडस्करचा संशयास्पद मृतदेह आढळला. अतिमद्यप्राशनामुळे डॉ. वडस्करचा मृत्यू झाल्याची तक्रार स्वत: सुनंदा आत्रामने पोलीस ठाण्यात केली होती. मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये विजय वडस्करचा मृत्यू गुदमरून झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि भादंवि ३0२ चा गुन्हा दाखल करून सुनंदा आत्राम आणि तिचा पुतण्या खजांजी आत्रामला अटक केली. सुनंदा आत्रामचे डॉ. वडस्करशी अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. सुनंदा आत्राम नगराध्यक्ष झाल्यानंतर आर्थिक देवाणघेवाणीतून या दोघांतील संबंध ताणले गेले. सुनंदा आत्राम पदावरून गेल्यानंतर प्रेमसंबंधात मोठी दरी निर्माण झाली. आणि त्यातूनच विजय वडस्करचा काटा काढल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर सरकार पक्षाने १५ जणांची साक्ष नोंदविली. यात सुनंदा आत्रामवर खुनाचा गुन्हा निश्‍चित झाल्याने विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर तिचा साथीदार पुतण्या खजांजी आत्राम याला खुनाच्या गुन्ह्यातून मुक्त करण्यात आले असले तरी पुरावे नष्ट केल्याप्रकरणी भादंवि २0१ अन्वये दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे अँड़ जयंत साळवे यांनी बाजू मांडली, तर सुनंदा आत्राम आणि खजांजी आत्रामतर्फे अँड़ संजय शिरपूरकर व अँड़ बुरिले यांनी बाजू मांडली. न्यायालयाचा निर्णय येताच सुनंदा आत्राम आणि खजांजी आत्रामला बल्लारपूर पोलिसांनी तत्काळ अटक केली. या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. न्यायालयाचा निर्णय येताच काँग्रेसच्या वतरुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.