Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर ०८, २०१३

चंद्रपूर जिल्हा परिषदेत ज्ञानसंपदा तरीही असंतोष

चंद्रपूर - यूपीएससी परीक्षेत राज्यातील चौसष्ट विद्यार्थ्यांत पहिल्या आलेल्या पुण्याच्या संपदा मेहता या देशातही 21व्या क्रमांकावर होत्या. त्याच्या रूपाने चंद्रपूर जिल्हा परिषदेला मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून ज्ञानसंपदा लाभली आहे. मात्र, त्यांच्या शिस्तप्रिय वागणुकीमुळे अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांत असंतोष दिसून येत आहे.

कोणताही नवा अधिकारी आला की, त्यांना जिल्ह्याची ओळख, प्रशासकीय कामाची पद्धत जाणून घेऊन नवीन कार्याला सुरुवात करावी लागते. काहीसा असाच प्रकार गेल्या महिन्यात रुजू झालेल्या नव्या मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता यांनीही सुरू केला आहे. जिल्हा परिषदेतील विविध खात्यात विभागप्रमुख अधिकारी आहेत. त्यामुळे कोणत्याही कामांच्या फायली त्यांच्या मार्फतीनेच येतात. पूर्वीचे अधिकारी फाईल थातूरमातूर तपासून स्वाक्षरी करायचे. त्यामुळे तीच सवय अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना झाली आहे. मात्र, ही सवय बदलविण्याचा पायंडा नव्या अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. त्याचा फटका टेबलाखालून चुपचाप कामे करून घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बसला आहे.
मागील काळात चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अरुण शिंदे होते. तेव्हाही त्यांच्यावर कारवाई करून हटविण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे यांच्यासह जि. प. सदस्यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी सहा फेब्रुवारी 2013 रोजी नागपुरात विभागीय आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर त्यांची शिंदे यांची अकोला जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली. या पदाचा कार्यभार अतिरिक्त जिल्हाधिकारी सी. एस. डहाळकर यांच्याकडे बराच काळ होता. त्यानंतर मे महिन्यात डॉ. माधवी खोडे यांच्या रूपाने चंद्रपूरला पहिली महिला मुख्य कार्यपालन अधिकारी मिळाली. मात्र, त्यांनाही जास्त दिवस खुर्चीवर बसता आले नाही. त्यामुळे पुन्हा प्रभार डहाळकर यांच्याकडे गेला. त्यानंतर नाशिक आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत संपदा मेहता यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली. पदभार स्वीकारून काही दिवस होत नाहीतोच पदाधिकाऱ्यासह अधिकाऱ्यांच्याही पोटात असंतोष दिसून येत आहे. पदासोबत येणारा अधिकार आणि ग्लॅमर न बघता चॅलेंज आणि पारदर्शी काम करण्यावर मेहता यांचा भर आहे. मात्र, या सगळ्या गोष्टी बाबूगिरी पद्धतीने कार्य करणाऱ्यांना महत्त्वाच्या वाटत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात असंतोष पसरला आहे.
मेहता यांच्याविषयी
संपदा मेहता यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पुण्याच्या मराठी माध्यमाच्या हुजूरपागा शाळेतून घेतले. जिद्द आणि चिकाटी, सकारात्मक दृष्टिकोन, ही त्यांच्या कार्याची पावती आहे. एक वर्ष दिल्लीत राहून यूपीएससीचे मार्गदर्शन मिळविले. दहावीत असतानाच आयएएस होण्याची स्वप्ने बघून ते सत्यात उतरविले. सहायक जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रकल्प अधिकारी आदी पदांवर त्यांनी कार्य केले आहे.
दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट

सर्वत्र दिवाळीची धामधूम असताना जिल्हा परिषदेत अध्यक्षांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना भाऊबीज भेट दिली. एका विषयाच्या अनुषंगाने संतापलेल्या अध्यक्षांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना थेट आपल्या कक्षात बोलावून घेतले आणि आल्या आल्याच त्यांनी भाऊबीजेची शाब्दिक भेट दिली. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.