Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर १९, २०१३

प्रेमविरहात घेतला प्रियकराने वाघाचा बळी

चंद्रपूर - "तुम मेरी हो नही सकती, तो मैं तुम्हे किसी ओर की होने नही दूँगा' हा संवाद आहे "धडकन' चित्रपटातील. असाच किस्सा येथेही घडला. ज्या तरुणीवर जिवापाड प्रेम केले, ती तिच्या वडिलांच्या आग्रहाखातर दुसऱ्याची झाली आणि तेव्हापासून हा प्रेमवीर वेडा झाला. बदला घेण्यासाठी चक्क त्याने मुलीच्या वडिलाविरुद्ध वाघाला जिवंत मारल्याची तक्रार केली आणि पुरलेल्या वाघाचे तुकडे शोधण्यासाठी वनविभागाने दिवसरात्र एक केले. अखेर आठ दिवसांनी खोटी तक्रार दिल्याचा उलगडा झाला.

राजुरा तालुक्‍यातील सुमठाणा बिटात येणाऱ्या माथरा येथील तक्रारकर्त्या तरुणाचे गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे तिच्यासोबतच लग्न करण्याचा निश्‍चय त्याने केला. पण, ऐनवेळी गावातील राजकारण आडवे आले. त्यामुळे त्याला ती मिळू शकली नाही. उलट तिच्या वडिलाने दुसऱ्या मुलाशी थाटात तिचे लग्न लावून दिले. त्यामुळे व्यथित झालेला हा प्रेमवीर वधूपित्याचा सूड घेण्यासाठी पुढे आला.

शेतातील कुंपणाला लावलेल्या वीजतारेला स्पर्श होऊन वाघाचा मृत्यू झाला आणि ही बाब कुणालाही कळू नये, यासाठी त्याची विल्हेवाट लावण्यात आली, अशी तोंडी तक्रार या प्रेमवीराने दिली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गावात चौकशी करू लागले. कधी शेतात, तर कधी जंगलात मृतदेह दडवून ठेवल्याची माहिती तो तरुण देत होता आणि त्यानुसार वनविभागाचे कर्मचारी शोध घेत होते. या तरुणाने ज्यांच्याविरुद्ध तक्रार दिली, त्यांच्यासह काहीजणांचे बयाण नोंदविण्यात आले. पण, त्यानंतरही काहीच हाती लागले नाही. मात्र, जाणीवपूर्वक बदनामी आणि फसविण्यासाठी हा तरुण इतक्‍यावरच थांबला नाही, तर चंद्रपूर वनवृत्ताच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून तोंडी तक्रार दिली. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार पुन्हा चौकशीला प्रारंभ झाला. गाव, शेत आणि जंगल शोधूनही वनाधिकाऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. रिकाम्या हाती परतलेल्या वनाधिकाऱ्यांनी मोहीम थांबविली. दरम्यान, तक्रारकर्त्या तरुणाच्या "प्रेम'कथेची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. या घटनेसंदर्भात राजुरा येथील वनाधिकारी श्री. काळे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनीही ही खोटी तक्रार द्वेषभावनेतून दिल्याचे सांगितले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.