Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर ०६, २०१३

तीस-या शेअर गुंतवणूक कंपनीच्या संचालकाला अटक;

जिल्ह्यातील साडेचारशे लोकांची ९ कोटीहून अधिकची फसवणूक  

चंद्रपूर- आतापर्यंत केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना फसविणा-या घोटाळेबाज कंपन्यांनी आता जिल्ह्याची सीमा ओलांडून विदर्भ गाठला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसातील तीस-या शेअर गुंतवणूक कंपनीच्या संचालकाला अटक झाल्याने सामान्य गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ताज्या घोटाळेबाज कंपनीचे नाव सिल्व्हर लाईन कॅपिटल असे आहे तर लुटीची एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील आकडेवारी आहे तब्बल ९ कोटी. 
आधी राजुरा शहरातील 'मनी मंत्र' , पाठोपाठ याच शहरातील 'मनी ट्री' व आता 'सिल्व्हर लाईन कॅपिटल' या  कंपन्यांनी शेअर गुंतवणुकीच्या नावावर  रक्कम दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचे सिध्द झाले आहे. राजुरा शहरातील २ कंपन्यांनी ग्राहकांना फसविल्यानंतर डोळे उघडलेल्या चंद्रपूर शहरातील सिल्व्हर लाईन कॅपिटल या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी आपली ठरलेली रक्कम मिळावी यासाठी कंपनीच्या कार्यालयात संचालकांकडे लकडा लावला. यापैकी काहीना लाखो रुपये गुंतवल्यानंतर देण्यात आलेल्या रकमांच्या अवधी पूर्ण झाल्या होत्या. याच काळात सिल्व्हर लाईनच्या संचालकांनी दिलेल्या धनादेशाचा बँकेतून परतीचा प्रवास सुरु झाला होता. अनेक गुंतवणूकदारांनी आधी विनवणी मग धमक्या देऊनही संचालक दाद देईनात. तेव्हा शहरातील रामनगर पोलिस ठाण्यात सिल्व्हर लाईन कॅपिटल कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे साडेचारशे गुंतवणूक दारांनी १ लाख ते तब्बल २० लाख अशा रकमा ठराविक मुदतीत दुप्पट होण्याच्या आमिषाने जमा केल्या होत्या. मात्र सर्व विश्वासाची माती करत याही कंपनीने सध्याच्या आकड्यानुसार तब्बल ९ कोटींचा गंडा घातला आहे.कुणी शेती विकून तर कुणी निवृत्तीची संपूर्ण रक्कम गुंतवून मोठ्या विश्वासाने भविष्याची आस लावत पैसे दिले मात्र हाती आला आहे केवळ पश्चात्ताप. 
सिल्व्हर लाईन कॅपिटल या घोटाळेबाज कंपनीने आपले जाळे  केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर लगतच्या गडचिरोली, गोंदिया आदी जिल्ह्यातही चकचकीत शाखा उघडून गरीब, मध्यमवर्गीय व समाजातील उच्चभ्रू व्यक्तीना आपले लक्ष्य केले.  यासाठी कंपनीने विविध ठिकाणी आपले एजंट नेमले होते. काही ठिकाणी तर वरिष्ठ सरकारी अधिका-यांना मोठ्या दलालीचे आमिष दाखवून अधिनस्थ कर्मचा-यांना या कंपनीमार्फत गुंतवणूक करण्याची सक्ती केली गेल्याच्या तक्रारी आहेत. सध्या पोलिसांनी सिल्व्हर लाईन कॅपिटल चा संचालक कर्मवीर तेलंग याला अटक करून ३ दिवसांची पोलिस कोठडी मिळविली आहे. अतिशय नियोजनबद्ध रीतीने आर्थिक लुबाडणूक करणा-या सिल्व्हर लाईन कॅपिटल सारख्या कंपन्यांबद्दल असणारी माहिती लोकांनी तातडीने द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 
चंद्रपूर जिल्ह्यातील शेअर गुंतवणूक करा व रक्कम अल्पावधीत दुप्पट करा अशी बतावणी करणा-या सर्वात पहिल्या मनीमंत्र कंपनीच्या घोटाळेबाज संचालक दाम्पत्त्याची चौकशी व त्यांनी लुबाडलेली रक्कम याची मोजदाद अद्याप सुरु आहे. हे दांपत्य गजाआड झाल्यावर मनी ट्री च्या उच्चभ्रू संचालकांना कोठडीची हवा खावी लागली आहे. आता सिल्व्हर लाईन कॅपिटल च्या संचालकांना कोठडीचे गज मोजावे लागत आहेत. प्रश्न केवळ या घोटाळेबाज संचालकांच्या मुसक्या बांधून सुटणार नाहीये. ज्यांनी तक्रार केली ते व ज्यांनी लाज वाटून तक्रार  न करता लाजेखातर मागे राहणे पसंत केले अशा हजारो छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांच्या रकमा परत मिळतील का हा खरा सवाल आहे. ज्यांनी अशा घोटाळेबाज कंपन्यांना सत्य माहित असूनही अभय दिले अशा पोलिस अधिका-यानाही शिक्षा होणे गरजेचे आहे. अन्यथा गुंतवणूकदारांची लूट सुरूच राहणार आहे. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.