Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर ३१, २०१३

डॉ. परशुराम खुणे यांना राज्य सरकारचा पुरस्कार

 
 राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारा कलावंताचा एक लाख रुपये पुरस्कार झाडीपट्टीचे दादा कोंडके डॉ. परशुराम खुणे यांना जाहीर झाला आहे.
झाडीपट्टीतील दादा कोंडके म्हणून डॉ. परशुराम खुणे प्रसिद्ध आहेत. झाडीपट्टीतील विनोदाचा बादशहा म्हणून ते गाजले. 1975 मध्ये डाकू जीवनावरील "येळकोट मल्हार' या नाटकातील पोलिसाची विनोदी भूमिका करून त्यांनी धमाल उडवून दिली. त्याच काळात दादा कोंडके यांचा पांडू हवालदार हा चित्रपट आला. दादा कोंडके सारखीच हुबेहूब भूमिका डॉ. खुणे करीत असल्याने त्यांना पुढे झाडीपट्टीतील दादा कोंडके म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
कुरखेडा तालुक्‍यातील एका खेड्यात जन्मलेल्या या कलावंताने श्रीकृष्ण प्राथमिक नाट्य मंडळाची स्थापना करून महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज कलाकारांना आमंत्रित केले. वयाच्या 12 व्या वर्षांपासून डॉ. खुणे झाडीपट्टी रंगभूमीवर कार्यरत आहेत. आजवर त्यांनी सहा हजारांवर नाट्यप्रयोगात आपली कला प्रदर्शित केली आहे. उमाजी नाईक, सिंहाचा छावा, स्वर्गावर स्वारी, तंट्या भिल्ल, मरीमाईचा भूत्या, सासू वरचढ जावई, बायको तुझी नजर माझी, संत तुकाराम आदी शेकडो नाटकात डॉक्‍टरांनी आपल्या विनोदी अभिनयाने रसिकांना पोट धरून हसविले आहे.
अभिनयाची पावती म्हणून नागपुरात स्मिता स्मृती पुरस्काराने 1997 मध्ये त्यांना गौरविण्यात आले. चंद्रपूर येथे 1996 व 1999 मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. खुणे हे केवळ कलावंतच नाही, तर एक प्रगतिशील शेतकरीसुद्धा आहेत. 1991 मध्ये त्यांचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने गौरव करण्यात आला. ते गुरनोली गावाचे सरपंच व तालुका सरपंच संघटनचे अध्यक्षपदीसुद्धा विराजमान होते. चित्रकार धनंजय नाकाडे यांना ते गुरू मानतात. डॉ. सुधाकर जोशी, प्रभाकर आंबोने, मधू जोशी, वडपल्लीवार गुरुजी, माजी न्यायमूर्ती ज्ञानदेव परशुरामकर, वत्सला पोडकमवार, मीना देशपांडे, रागिणी बिडकर, शबाना खान हे त्याचे आवडते सहकारी कलावंत, ईस्माईल शेख, शेखर डोंगरे, कमलाकर बोरकर आदी मंडळीचे विशेष सहकार्य त्यांना मिळाले. डॉ. खुणे १५ वर्षे गुरनुलीचे सरपंच व ५ वर्षे उपसरपंच होते. १० वर्षांपासून झाडीपट्टी कला मंचचे ते अध्यक्ष असून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यही करीत आहेत.
त्यांना १९९१ ला महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार, १९९२ ला जादूगार सुनील भवसार स्मृती पुरस्कार, १९९५ ला श्यामराव बापू प्रतिष्ठानच्या कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. खुणे यांच्या सिंहाचा छावा, स्वर्गावर स्वारी, लग्नाची बेडी, एकच प्याला, मरीमायचा भुत्या, लावणी भुलली अभंगाला, मी बायको तुझ्या नवऱ्याची, एक नार तीन बेजार, बायको का मातून गेली? नाथ हा माझा, इत्यादी नाटकातील भूमिका अत्यंत गाजल्या.  नाटय़क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना 'गडचिरोली गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.