Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर २६, २०१३

पगला घोडा: एक सर्वांगसुंदर नाट्य

पगला घोडा: एक सर्वांगसुंदर नाट्य

पुरूषांनी आपल्या हेकेखोरपणापायी नाकारलेलं स्त्रीचं प्रेम आणि त्यामुळे त्या महिलांची होणारी शोकांतिका व त्यातून पुरूषांनी आलेले नैराश्य मांडणारे 'पगला घोडा' हे नाटक यवतमाळच्या अस्मिती रंगायतन या संस्थेनं सादर केलं. अशोक आष्टीकर यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या नाटकाचा मराठी अनुवाद प्रख्यात अभिनेते अमोल पालेकर यांनी केला आहे. मुळातच कठीण असलेली ही संहिता प्रत्यक्षात रंगमंचावर सादर करणे खरे तर कसोटी ठरते. परंतु अशोक आष्टीकर यांनी या कसोटीला उतरण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. प्रतिकात्मक अशा कथानकाला दिग्दर्शनाची उत्तम जोड मिळाल्याने हे नाटक रसिक प्रेक्षकांना आनंद देणारे ठरले.
एका स्मशानात दोन तास घडणारे हे नाटक सुरूवातीला फार वेग पकडत नाही. त्यामुळे रसिकांनाही रंगमंचावर काय घडते आहे, हे कळत नाही. एका अनोळखी मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी रात्रीच्यावेळी स्मशानात आलेले कार्तिक (राजन टोंगो), शशी (सौरभ अंजनकर), हेमंत (केतन पळसकर) व लालू (अशोक आष्टीकर) हे चौघेजण चिता संपूर्णपणे जळण्याची वाट पाहत त्याच ठिकाणी एका चबुतर्‍यावर बसतात. लालूने सोबत दारूच्या बाटल्या आणलेल्या असतात. त्यामुळे एकीकडे चिता जळत असताना दुसरीकडे गप्पांचा फड रंगतो. गप्पांच्या ओघात प्रत्येकाला आपली प्रेमकथा आठवते. ते सर्वजण आपापल्या आयुष्यात आलेल्या ुमुलींचे प्रसंग एकमेकांशी शेअर करतात. हेकेखोर स्वभावामुळे स्त्रीला नाकारण्याचं दु:ख प्रत्येकाच्या कथेतून व्यक्त होतं. स्वीकारल्यानंतर आयुष्य किती सुंदर झालं असतं, याची जाणिवही यावेळी सर्वांना होते. हीच या नाटकाची कथा.
गेली अनेक वर्षे नाटकाशी जुळून असलेल्या अशोक आष्टीकर, राजन टोंगो यांनी आपल्या भूमिका सर्मथपणे पार पाडल्या. सौरभने साकारलेला शशीही उत्तम होता. केतन पळसकर मात्र अभिनयात किंचीत मागे पडला. प्रेमकथा सांगताना प्रत्येक प्रेयसीची भूमिका मुक्तीका वाटखेडकर हिने साकारली. तिने दज्रेदार अभिनयातून प्रेक्षकांवर आपली छाप पाडली. नाटकाचा विषय जड असला तरी प्रेक्षक मात्र अखेरपर्यंत नाटकात रममाण झाले, हेच या नाटकाचे यश म्हणावे लागेल. अशोक आष्टीकर, राजन टोंगो, मुक्तीका वाटखेडकर यांच्यासह अन्य कलावंतांनीही प्रचंड मेहनत घेतल्याचे जाणवले. उत्तम संवादफेक, आंगिक अभियन यातून हे नाटक अधिक फुलत गेले. या नाट्यकृतीच्या सादरीकरणाला अधिक वाव होता. कमकुवत प्रकाश योजना या नाट्यकृतीतील मोठी उणिव होती. या नाटकाला सिद्धार्थ जयस्वाल यांनी संगीत दिले. अशोक कार्लेकर यांनी प्रकाश योजना सांभाळली. निरज खराबे, किशोर माहुरे यांचे नेपथ्य, तर रंगमंच व्यवस्था मंगेश इंगळे, अंकुश पांडे, भूषण जोशी यांनी सांभाळली. वेशभूषा निवेदिता आगलावे यांची होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.