सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड
चंद्रपूर- भद्रावती ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांनी मृतदेह न उचलल्याच्या कारणावरून बहिणीला प्रसूतीसाठी दाखल करण्यासाठी आलेल्या तीन भावंडांना बेदम मारहाण केली, अशी तक्रार तीन भावंडांनी जिल्हा पोलिस अधीक्षकाकडे केली, अशी माहिती तक्रारकर्त्यांनी पत्रपरिषदेत दिली.
१ ऑक्टोबरला रॉबिन येमुर्लेवार, नितीन येमुर्लेवार आणि मंगेश पुसनाके या युवकांनी बहिणीला प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याचवेळी अमोल मालेकर या युवकाचा अपघात झाल्यानंतर त्याचा मृतदेह रुग्णालयात आणला. त्यावेळी आव्हाड यांनी हा मृतदेह शवविच्छेदन केंद्रात नेण्यासाठी युवकांवर दबाव आणला. या युवकांनी आमची बहीण रुग्णालयात दाखल आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. तुमच्या सोबत पोलिस आहे, त्यांना सांगा, अशी विनंती केली. मात्र, रात्री तालात असलेले आव्हाड ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. या तिन्ही युवांना त्यांनी बेदम मारहाण केली. त्यांची बहीण प्रसुती वेदनेने विव्हळत असताना आव्हाड त्यांना मारहाण करीत होते. याचवेळी आव्हाड यांनी शिविगाळ केल्याचा आरोप सदर युवकांनी केला. दरम्यान, या युवकांनी आज गुरुवारला जिल्हा पोलिस अधीक्षकाची भेट घेतली आणि आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. आव्हाड यांच्यावर निलंबनासाठी कारवाई करावी, अशी मागणी या युवकांनी केली आहे.