Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर ०५, २०१३

नगराध्यक्षांच्या सासर्‍यासह तिघांना अटक

सालासर जिनिंग आणि प्रेसिंग कारखान्यात दुर्घटनाग्रस्त मुलीला दिली नाही मदत

राजुरा: सालासर जिनिंग आणि प्रेसिंग कारखान्यात शीतल डंबारे (१६) ही मुलगी मजूर म्हणून काम करते. मात्र कारखान्यात झालेल्या एका अपघातात ती अपंग झाली. तिला नुकसान भरपाई देण्याचे आश्‍वासन कंपनी व्यवस्थापनाने दिले होते. मात्र दीड वर्षानंतरही मदत न दिल्याने पीडित मुलीने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी कंपनीच्या तीन संचालकांविरुध्द भादंविच्या ३८८ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. यातील एक संचालक राजुरा नगराध्यक्षांचा सासरा आहे, हे विशेष.
पांडुरंग हनुमंत चिल्लावार (६२), गोपाल नारायण झंवर (५0) व राजेंद्र हनुमान झंवर (३५) अशी आरोपींची नावे आहेत. शितल डंबारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गडचांदूर मार्गावरील कापनगाव येथील सालासर जिनींग आणि प्रेसींग कंपनीत २४ एप्रिल २0१२ रोजी मजुरीचे काम करीत असताना एका मशीनमध्ये अपघात झाला. यात शितलच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला जिनिंग कंपनीच्या उपरोक्त तिन्ही संचालकांनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने तिचा पाय कापण्यात आला. यामुळे शितलला आयुष्यभरासाठी अपंग व्हावे लागले. जिनिंग कंपनीच्या संचालकांनी तिच्या उपचारासाठी पैसे दिले. मात्र तिला कुठलीही नुकसान भरपाई दिली नाही. तिच्या कुटुंबियांना व नागरिकांनी ओरड केल्यानंतर शितलच्या लग्नाचा सर्व खर्च, एक जयपुरी कृत्रिम पाय व घरी शौचालय बांधून देण्याचे आश्‍वासन कंपनीच्या संचालकांनी दिले. या मदतीच्या प्रतीक्षेतच एक वर्ष लोटून गेला. कुठलीही मदत मिळाली नाही. दरम्यान, पोलीस किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी तक्रार केल्यास जिवंत मारण्याची धमकी देण्यात येत होती, असेही शितलने तक्रारी म्हटले आहे. त्यानंतर आज तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पांडुरंग हनुमंत चिल्लावार (६२), गोपाल नारायण झंवर (५0) व राजेंद्र हनुमान झंवर (३५) या कंपनी संचालकांना पोलीस ठाण्यात बोलाविले. दरम्यान, त्यांच्याविरुध्द भादंविच्या ३८८ कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तिघांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. यातील पांडुरंग चिल्लावार हे राजुर्‍याच्या विद्यमान नगराध्यक्ष आरती चिल्लावार यांचे सासरे होत. त्यामुळे आज शहरात या प्रकरणाची चांगलीच चर्चा होती. शितल डंबारे ही मुलगी बालकामगार आहे. तिला खोटे आश्‍वासन दिल्याने या दृष्टीनेही कारवाई केली जावी. आणि आरोपी हे नगराध्यक्षांचे सासरे असल्याने त्यांना पोलिसांनी पाठिशी घालू नये, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी) ■ उपरोक्त तीन संचालकांपैकी पांडुरंग चिल्लावार हे नगराध्यक्ष आरती चिल्लावार यांचे सासरे असल्याने पोलिसांकडून त्यांना विशेष सूट देण्यात येत होती. अटक झाल्यानंतर फिगर प्रिंट घेतले जातात, वैद्यकीय तपासणी होते व पोलीस आपल्या वाहनात त्यांना न्यायालयात हजर करतात. मात्र यावेळी तिन्ही संचालक आपल्या खासगी वाहनातून न्यायालयात गेल्याचे दिसून आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.