Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर ०७, २०१३

प्रहारच्या नेतृत्वात महापालिकेवर मारबत

 चंद्रपूर : चंद्रपूर महानगरात अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. मनपाकडे निधी आहे. कामांना मंजुरीही आहे. तरीदेखील अद्याप एकही समस्या सुटू शकली नाही. मागील दोन वर्षांपासून तर रस्त्यांच्या दुर्दशेने चंद्रपूरकर हैराण झाले आहे. नुसते हैराणच नाही तर अनेक आजारालाही बळी पडत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आज प्रहारच्या नेतृत्वात महापालिकेवर मारबत काढण्यात आली. यावेळी अधिकारी व पदाधिकार्‍यांच्या नावाने झडत्याही देण्यात आल्या.
प्रहारतर्फे महापालिकेवर अशी मारबत काढण्यात आली. ९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. या पार्श्‍वभूमिवर मनपा प्रशासनाने करावयाच्या अनेक गोष्टी आहेत. मात्र महाकाली यात्रेदरम्यानची नियोजनशून्यता यावेळीदेखील मनपाने कायम ठेवली आहे. चंद्रपुरात चार वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली. मोठय़ा प्रमाणात कचरा नदीकाठावर वाहत आला आहे. काही नागरिक गणरायाचे एका दिवसानंतरच विसर्जन करतात. अशा परिस्थितीत नदीच्या काठावर व रामाळा तलावात स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. शहरातील रस्त्यांवरील खड्डेही बुजविण्यात आलेले नाही. त्यामुळे गणरायाचा प्रवास खड्डयातून होणार असल्याचे दिसते.
शहरातील नागरिक मागील दोन वर्षांपासून खड्डे, धूळ, व रस्त्यांच्या दुर्दशेमुळे त्रस्त आहेत. मागील वर्षी महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. वाढलेल्या विविध करांचा सहर्ष स्वीकार करीत जनतेने मनपाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. आज ना उद्या परिस्थिती सुधारेल, या अपेक्षेत जनता वर्षभर विकासकामांची वाट पहात राहिले. कधी मनपाचे आयुक्त, कधी महापौर- उपमहापौर तर कधी नियोजन सभापती सारेच शहराचा कायापालट करण्याचे मोठे -मोठे आश्‍वासन देत आहेत. मात्र दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. पूरपरिस्थितीमध्ये मनापाच्या इंदिरा नगर नागरी आरोग्य केंद्रात डॉक्टर अनुपस्थितीत होते. केवळ एक पाण्याचा टँकर व एक चालक यांचा वापर करुन पूरग्रस्त भागामध्ये मनपाने पिण्याचे पाणी पुरविले. अनेक ठिकाणी पीडित नागरिकांना तासान्तास पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागली. पुरानंतर माफक प्रमाणात फागिंग मशीनद्वारे फवारणीचे कामसुद्धा झालेले नाही. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंग्यूचा संशयित रुग्णही आढळून आला. अशा सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्याच्या हेतूने प्रहार संघटनेतर्फे आज पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी पारंपरिक पद्धतीने मारबत काढली. सहा फूट उंचीचा पुतळा उभारुन त्यावर 'खड्डे, धूळ घेऊन जा गे मारबत' असे लिहिण्यात आले होते. ढोल ताशांच्या गजरात गांधी चौकातून मारबतीची मिरवणूक काढण्यात आली. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतलेल्या फलकावर बोलबच्चन मनपा आयुक्त व पदाधिकारी यांचे खोटे आश्‍वासन घेऊन जा गे मारबत, मनपाचे टिसाळ नियोजन घेऊन जा गे मारबत, मानेचे मणक्याचे दुखणे, श्‍वसनाचे आजार घेऊन जा गे मारबत, असे लक्षवेधी नारे लिहिण्यात आले होते. या मिरवणुकीचा जटपुरा गेट येथे समारोप करण्यात आला. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख, शहर अध्यक्ष अमुल रामटेके, कातिक झोया, अक्षय येरगुडे, विशाल बिरमवार, अब्दुलशेख, नजहर खान, पठान,दुशंत लाटेलवार, गोलू दखणे, हर्षल बैरम, शेख इमदाद उल्ला, सतीश गीरसावळे, प्रफुल बैराम, श्रीकांत डब्बल, अवी शेट, इमरान रजा,अमोल चिताडे उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.