Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर १७, २०१३

२६५.८८ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत

 चंद्रपूर : जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत यंदा २६५ कोटी ८८ लाख ५0 हजार रुपयांचा निधी आला आहे. तो गेल्या दोन वर्षांसारखा १00 टक्के खर्च करा, त्यासाठी मान्यता मिळवून घ्या, अशा सूचना पालकमंत्री संजय देवतळे यांनी आज जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या बैठकीत दिल्या.
जिल्हा नियोजन समितीची बैठक आज बचत साफल्य भवनात घेण्यात आली. खासदार हंसराज अहीर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संतोष कुंभरे, आमदार शोभाताई फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, सुभाष धोटे, नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस. डहाळकर, मनपा आयुक्त प्रकाश बोखड,उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आशुतोष सलील उपस्थित होते.
बैठकीत निधीच्या खर्चासंदर्भात पालकमंत्री म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना सन २0१३-१४ करिता सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना क्षेत्रा बाहेरील योजना व विशेष घटक योजना, अशा चारही योजना मिळून ३१२ कोटी नऊ लाख ८४ हजार मंजूर नियतव्यय आहे. त्यावेळी ३१२ कोटी एक लाख ८४ हजार रुपये अर्थसंकल्पीय तरतूद आहे. त्यातील २६५ कोटी ८८ लाख ५0 हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे, तो पूर्णत: खर्च करा.
या बैठकीत खासदार हंसराज अहीर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संतोष कुंभरे, आमदार शोभाताई फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, सुभाष धोटे, नाना शामकुळे यांनी कृषी विभाग, अतवृष्टी, रिक्त पदे, आरोग्य, सिंचन, वीज आदी विषयावरील प्रश्न व समस्या या मांडल्या तसेच प्रशासनाला सूचना केल्या. आमदार सुधीर मुनगंटीवार डेंग्यूसंदर्भात जनजागरण, पुरग्रस्तांना केंद्राकडून हेक्टरी २५ हजार मदत, रस्त्यासाठी ५00 कोटी व शेतकर्‍यांची वीज न कापणे अशा आशयाचे चार ठराव या बैठकीत मांडले.
अतवृष्टीमुळे वारंवार बाधित होणार्‍या ८६ गावांचे सर्वेक्षण करणे, चंद्रपूर शहरासाठी असणार्‍या रेड लाईन ब्ल्यु लाईन आखण्यासाठी सर्वेक्षण करणे, नाल्यांचे खोलीकरण, पुरसंरक्षण भिंत उभारणे यासाठी जिल्हा नियोजनमधून तरतूद करण्याचे बैठकीत ठरले.
पिकांवर रोगाचा प्रादरुभाव झाला असून फवारणीसाठी औषध उपलब्ध करून द्यावे, जनावरांना रोगापासून वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ताबडतोब प्रयत्न करावे तसेच ज्या शेतकर्‍यांनी पैसे भरले अशा शेतकर्‍यांची वीज कापू नये व ट्रान्सफार्मर बंद करू नये, अशी मागणी सर्व आमदारांनी केली. नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत विविध विभागाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत ठेवले व समितीने त्यास मंजुरी दिली. बैठकीचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम. सोनकुसरे यांनी केले तर आभार समाज कल्याण सह आयुक्त बर्गे यांनी मानले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.