Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर ०४, २०१३

दोन वर्षांत 430 वाहनांची चोरी

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - सोनसाखळी चोऱ्या आणि घरफोड्यांचे सत्र सुरू असताना जिल्ह्यात वाहनचोरीच्या घटनांमध्येही कमालीची वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांचा आढावा घेतला असता तब्बल 430 वाहने चोरीला गेली आहेत. या वाहनांमध्ये मोटारसायकल, ट्रक आणि कार या मोठ्या वाहनांचा समावेश आहे. एकट्या चंद्रपूर शहरात 180 वाहने चोरीला गेलीत.

या घटना रोखण्यात पोलिसांना यश येत नाही. वाढत्या लोकसंख्येसोबत वाहनांच्या संख्येमुळे पार्किंगची समस्या जाणवत आहे. त्यामुळे वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वाढत्या वाहनचोरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. जुलै 2011 ते ऑगस्ट 2013 या काळात सुमारे 430 वाहने चोरीला गेलीत. यात 40 हून अधिक ट्रकचा समावेश आहे. औद्योगिक क्षेत्र असलेल्या चंद्रपूर, घुग्घुस, गडचांदूर आणि राजुरा परिसरात कंपन्यांमध्ये ट्रक असतात. पार्किंगसाठी जागा नसल्याने हे ट्रक रस्त्यावर उभे केले जातात. याच संधीचा फायदा घेऊन चोरटे बनावट चाव्यांच्या आधारावर ट्रकसुद्धा पळवून नेत आहेत. जिल्ह्यात मागील काही वर्षांपूर्वी चालकांना जिवे मारून ट्रक पळविल्याच्या घटना उजेडात आल्या होत्या. मागील दोन वर्षांत एकट्या घुग्घुस येथून 18 ट्रक चोरीला गेलेत. चंद्रपूर शहर परिसरातून नऊ ट्रक, गडचांदूर, वरोरा व भद्रावती येथून प्रत्येकी तीन चोरीला गेले. यामुळे औद्योगिक क्षेत्रातही वाहने असुरक्षित असल्याचे दिसून येते. वाहनांची चोरी करायची आणि त्याचे सुटे भाग करून ते भंगारात विकायचे, असा उपक्रम चोरटे राबवितात. त्यामुळे वाहनांची मूळ ओळख नष्ट होते. या कारणामुळे पोलिससुद्धा वाहनापर्यंत पोहोचू शकत नाहीत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.