Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट २१, २०१३

नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा निषेध

चंद्रपूर : पुरोगामी विचारवंत तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची आज सकाळी पुण्यात अज्ञात माथेफिरूंनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचे पडसाद चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातही उमटले.
येथील जटपुरा गेट परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ विविधस्तरातील सामाजिक कार्यकर्ते एकत्र आलेत. 'डॉ.नरेंद्र दाभोळकर अमर रहे' अशा घोषणा देत या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून कठोर शब्दात निषेध नोंदविला. डॉ.दाभोळकरांच्या मारेकर्‍यांना हुडकून काढून त्यांना फासावर लटकवा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी कायदा पारित करावा, या मागणीसाठी डॉ.दाभोळकरांचा लढा सुरू होता. त्यागाचे आयुष्य जगणार्‍या या माणसाचे जाणे सर्वांसाठी वेदनादायी आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे शासनाने अंधश्रद्धा विरोधी बिल पास करावे. त्यांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे मनोगत यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. सभेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर पोतनवार, किशोर जामदार, नगरसेवक तथा चंद्रपूर सोशल अकॅडमीचे सचिव संजय वैद्य, प्रा.सुरेश चोपणे, प्रा.सुरेश दुधपचारे, इको-प्रोचे बंडू धोतरे, माकपचे जिल्हा सचिव राजेश पिंजरकर, पुरोगामी महिला समितीच्या मालती सगणे, सूर्यकांत खनके, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप अडकीने, जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.