Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट १७, २०१३

चिमूर - नागभिडला नगर परिषदेचा दर्जा

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा

पूरग्रस्तांच्या पूनर्वसनासाठी कायमस्वरुपी उपाययोजना आखणार

जिल्हा नियोजनचा 15 टक्के निधी पूरग्रस्तांसाठी राखीव



चंद्रपूर - चिमूर व नागभिड ग्राम पंचायतला नगर पालिकेचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज चिमूर येथे केली. राज्यातील इतर जिल्हा निर्मितीचा विचार होईल तेव्हा चिमूर जिल्हयाला प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. चिमूर येथे आयोजित शहिद स्मृती दिन सोहळयात मुख्यमंत्री बोलत होते.

पालकमंत्री संजय देवतळे, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत, खासदार मारोतराव कोवासे, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार विजय वडेट्टीवार, आ.सुभाष धोटे, आ.डॉ.नामेदव उसेंडी, आ.दिपक आत्राम व कॉग्रेसचे महाराष्ट्राचे सहायक प्रभारी बाला बच्‍चन प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वातंत्र सैनिकांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून सत्कार केला.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी किल्ला परिसरातील शहिद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर तहसिल कार्यालय येथे चिमूर शहरातील मुख्य रस्त्याच्या चौपदीकरणासह सिमेंट क्रांकीट रस्त्याचे भूमिपूजन, एकात्मिक प्रकल्प कार्यालयाच्या नुतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन व भिसी-चिमूर-मासळ-कोलारा रस्त्यावरील पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, पूरपरिस्थितीमुळे नागरिकांवर वारंवार विस्थापीत होण्याची वेळ येवू नये म्हणून पूरग्रस्तांच्या पूनर्वसणासाठी कायमस्वरुपी उपाययोजना आखली जाईल. रेड लाईन व ब्ल्यु लाईन तसेच नदीच्या पात्रात नागरिकांनी घर बांधू नये असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. चंद्रपूर जिल्हयातील 29 मामा तलावाच्या दुरुस्तीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून यासाठी 5 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. दुरुस्तीचे प्रस्ताव प्राप्त होताच आणखी तरतूद करण्यात येईल.
विदर्भातील नदयाच्या खोलीकरणाची महत्वाकांक्षी योजना हाती घेण्यात येणार असून यासाठी निरीकडून प्रस्ताव मागविण्यात आला आहे. यात चंद्रपूर येथील इरई व झरपट नदीचा समावेश आहे. नदी खोलीकरणासाठी नागपूर व अमरावती येथे 10 कोटी रुपये किंमतीची ड्रेझर मशिन ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे चंद्रपूरसह विदर्भात मोठया प्रमाणात शेत पिकाचे व घरांचे नुकसान झाले असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा नियोजनमध्ये 15 टक्के निधी राखून ठेवण्यात येणार आहे. या संबंधिचा शासन निर्णय निर्गमीत केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्हयातील पूरग्रस्त शेतकरी व नागरिकांना प्रशासनाने मदत करण्यात येत असून मृतकांच्या नातेवाईकांना आपण स्वत: मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1 लाख रुपयाची अतिरीक्त मदत केल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या समतोल विकासाचा अभ्यास करण्यासाठी केळकर समितीची स्थापन केल्याचे सांगून विदर्भाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्याच्या नवीन औद्योगिक धोरणात विदर्भाला झुकते माप दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मिहान मध्ये जागतिक किर्तीच्या कंपन्या येण्यास सुरवात झाली असून यामुळे विदर्भाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतक-यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून शेतक-यांना सरळ हाताने मदत करण्याची भूमिका शासनाने स्विकारली असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. तातडीची मदत म्हणून 400 कोटी , रस्ते व शासकीय इमारतीच्या दुरुस्तीसाठी 600 कोटी व कायमस्वरुपी पूनर्वसणासाठी 500 कोटी रुपयाची तरतूद अधिवशेनात घोषित केलेल्या पॅकेजमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. कायमस्वरुपी पूनर्वसणासाठी जिल्हा व तालुक्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पालकमंत्री संजय देवतळे, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोहयोमंत्री नितीन राऊत, खासदार मारोतराव कोवासे, प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार नामदेव उसेंडी व बाला बच्‍चन यांची यावेळी भाषणे झाली. चिमूर जिल्हा निर्मितीसह चिमूर,नागभिड ग्राम पंचायला नगर पालिकेचा दर्जा दयावा अशी मागणी कार्यक्रमाचे आयोजक आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रास्ताविकात केली.

तहसिल कार्यालय येथे आयोजित भूमिपूजन कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, आदिवासी अप्पर आयुक्त पल्लवी दराडे, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर व अधिक्षक अभियंता बळवंत लुगे याचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.