Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट २७, २०१३

दहा हजार चंद्रपूरकरांना "ताप'

चंद्रपूर - पूरपरिस्थितीतून सावरत असलेल्या चंद्रपूरकरांना आता संसर्गजन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. जवळपास चार हजार 40 नागरिकांना या आजाराची लागण झाल्याचे महानगरपालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले. मात्र, हा आकडा दहा हजारांच्या घरात आहे, अशी शक्‍यता आहे. 
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चंद्रपूर शहराला जवळपास तीनदा पुराचा विळखा बसला. अर्धे शहर पाण्याखाली गेले होते. नदीकाठावरील हजारो घरांत पाणी घुसले. पूर ओसरल्यानंतर पुराचे पाणी शिरलेल्या वस्त्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले. पाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनही जागोजागी फुटल्याने दूषित पाणीपुरवठा शहरात सुरू होता. पुरानंतर मनपाने हाती घेतलेली स्वच्छता मोहीमही फारशी परिणामकारक ठरली नाही. त्याचा परिणाम आता संसर्गजन्य आजारांमध्ये दिसून येत आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, आता साचलेले पाणी, घाण आणि हवामानातील बदल यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.
पूरस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या आजारांच्या सर्वेक्षणाचे काम मनपाच्या आरोग्य विभागाने 18 जुलैपासून हाती घेतले होते. पुराचा फटका बसलेल्या वस्त्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. जुलै महिन्यांत 73 हजार 942 जणांची तपासणी केली. तेव्हा 768 जणांना विषाणूजन्य आजारांची लागण झाल्याचे दिसून आले. या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरातील नदीकाठावरील अनेक वस्त्यांत पाणी शिरले होते. अनेकांनी समाजमंदिर, महानगरपालिका शाळा, मंगल कार्यालयात आसरा घेतला होता. तेव्हाही सर्वेक्षणाचे काम चंद्रपूर शहरात सुरू होते. 22 ऑगस्टला हे काम पूर्ण झाले. त्यात एक हजार 972 जणांना विषाणूजन्य आजारांची लागण झाली होती. अतिसाराचे 465 रुग्ण पाहणीत आढळून आले. ज्वराने फणफणत असलेले दोन हजार 20 रुग्ण आढळून आले. या सर्वच रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.