Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट ३०, २०१३

थंड पाण्याची 'शुद्ध' फसवणूक न्यायालयात

चंद्रपूर - थंड पाणी विक्रीच्या व्यवसायात उतरलेल्या अनेक व्यावसायिकांच्या आता मुसक्‍या आवळणे अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केले. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील पंधरा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही प्रकरणे आता न्यायालयात आहेत. 
हजारो रुपये गुंतवायचे अन्‌ लाखो रुपये कमवायचे, असे समीकरण थंड पाणी विक्रीचे आहे. उन्हाळा लागला की, थंड पाण्याची विक्री जोरात सुरू होते. गुंतवणूक कमी आणि नफा जास्त असल्याने अशा व्यावसायिकांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. एकट्या चंद्रपूर शहरात कोणताही परवाना न बाळगता थंड पाणी विक्री करणाऱ्यांची संख्या वीस- पंचवीसच्या आसपास आहे. आता मात्र पाणी डोक्‍यावरून गेल्याने नाइलाज म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई सुरू केली आहे.

मे महिन्यात चिमूर येथील श्रीहरी जलसेवा प्रकल्पावर या विभागाने कारवाई केली. त्यानंतर काही विक्रेत्यांवरही कारवाईचे सत्र सुरू होते. कारवाईच्या सत्रामुळे मधल्या काळात "चोरी-चोरी चुपके- चुपके' विक्री सुरू होती. याची भणक लागल्याने अन्न व औषधी प्रशासन विभागाने जिल्ह्यातील थंड पाण्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या प्लांटला भेटी दिल्यात. त्यांना नोटीस देऊन समज देण्यात आली. मात्र, त्याचा काहीएक फरक पडला नाही. यामुळे विभागाने जिल्ह्यातील तब्बल पंधरा थंड पाणी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले.
यात मेसर्स क्रिस्टल वॉटर प्लांट बल्लारपूर, ऑरो ऍक्वा फाइन राजुरा, ऑक्‍सी लाइफ रामपूर, प्युअर ऍक्वा बल्लारपूर, ऑक्‍सी लाइफ बल्लारपूर, अरची ऍक्वा इंडस्ट्रीज ब्रह्मपुरी, इम्यॅनुअल ई ऍक्वा उदापूर, श्री बालाजी ऍक्‍वा भद्रावती, एयमन थंडर फ्रेश भद्रावती आणि विलास ऍक्वा चिल्ड यांचा समावेश आहे.
भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणपत्र व अन्न सुरक्षा मानद कायद्यांतर्गत परवाना न घेता पाण्यावर प्रक्रिया करून त्याची जारमध्ये विक्री करण्याचे प्रताप या विक्रेत्यांच्या नावावर आहेत. हे व्यावसायिक विहीर, बोअरवेलचे पाणी "स्टोअर टॅंक'मध्ये पाठवितात. तेथून ते फिल्टर करतात. मात्र, हे फिल्टरसुद्धा केवळ नावालाच असते. त्यानंतर पाणी चिलिंग टॅंकमध्ये पाठविले जाते. तेथून थेट कॅनमध्ये साठवणूक करून ग्राहकांच्या माथी मारले जाते. 20 ते 30 रुपये कॅनप्रमाणे या पाण्याची विक्री बाजारात होते. थंड पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणपत्र आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना लागतो. मात्र, या दोन्ही विभागांची परवानगी न घेताच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर थंड पाण्याची विक्री सुरू आहे. चंद्रपूर शहरातील काही विक्रेत्यांवर नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी नंदनवार, चहांदे यांनी दिली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.