चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात 36.08 सरासरीसह 541.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यात वरोरा, कोरपना, जिवती या तालुक्यात 100 मि.मी. हून अधिक पाउस पडला आहे.
अतिवृष्टीमुळे चंद्रपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून हैद्राबाद हायवे ठप्प झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 742 मिमी सरासरीसह 11,134 मिमी पाऊस पडला आहे. या पावसामुळे चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची सर्व (७) दारे अर्ध्या मीटरने उघडली आहेत. यामुळे शहराला वळसा घालणा-या इरई नदीचे पाणी हवेली गार्डन, दाताळा मार्ग, रहमतनगर, पठाणपुरा या भागात पोहचले आहे. सखल भागात गुडघाभर पाणी शिरल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे इरई नदीने पात्र सोडल्याने नदीकाठच्या आरवट, माना, नांदगाव क़ोलगाव, भोयेगाव आदी गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. वर्धा नदीचे पाणी पुलावर चढल्याने बल्लारपूर शहरालगतचा हैद्राबाद मार्गावरील मोठा पूल पाण्याखाली आला आहे. यामुळे हैद्राबाद मार्ग बंद झाला असून ५ किमी पर्यंत शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या अतिवृष्टीमुळे या भागात असलेल्या डझनभर कोळसा खाणीतील उत्पादन कार्य ठप्प होण्याची शक्य निर्माण झाली आहे. राजुरा शहरातील काही भाग पुराच्या पाण्याने वेढण्यास सुरुवात झाली आहे. सध्याही जिल्ह्यात रिमझिम पाउस सुरु असून इरई धरणाची दारे अधिक उघडली जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास शहरात पूरस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.