चंद्रपूर, : नागभीड येथील स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील अनाथ मतिमंद विक्रमवर हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया वर्धा येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली.
बेवारसरित्या सापडलेला विक्रम अनाथ व मतिमंद आहे. सध्या तो १२ वर्षांचा आहे. बालकल्याण समितीने त्याला लोककल्याण बहुद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित नागभीड येथील स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत मागील दोन वर्षापासून वास्तव्यास ठेवले. मात्र, त्याला हृदयाचा आजार जाणवू लागला. त्यामुळे संस्थेचे सचिव पुरुषोत्तम चौधरी यांनी त्याला वर्धा (सावंगी मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. संचेती यांच्या पुढाकारात त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अपंग आयुक्तालय पुणे द्वारा २०११ मध्ये मान्यता मिळालेल्या स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत ४० बालके असून, १० जण मतिमंद आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत ३० बालके आपल्या घरी जातात. मात्र, १० बालकांच्या संस्थेतच राहून शिक्षण घ्यावे लागत आहे. शासनाकडून कोणत्याही प्रकारचा अनुदान नसतानाही ही संस्था बालकांचे पालनपोषण करीत आहे.