चंद्रपूर- विदर्भातील ज्येष्ठ नाट्यकलावंत, दिग्दर्शक, नाट्यलेखक आणि चित्रकार सदानंद बोरकर यांना यावर्षीचा वसंत सोमण रंगकर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी मुंबईत या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. मुंबई येथील दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे २ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात सदानंद बोरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १० हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
बोरकर यांनी ‘माझं कुंकू मीच पुसलं’, ‘आत्महत्या’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘नवरे झाले बावरे’ यासह अनेक सामाजिक नाटके लिहिली आहेत. ‘माझं कुंकू मीच पुसलं’ या नाटकाचा विद्यापीठाच्या एम. ए. या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून, ‘आत्महत्या’ हे नाटक २००९ मध्ये सार्क इंटरनॅशनल इअरचे नामांकन तसेच ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल च्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. नाट्यक्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.