पालकमंत्री संजय देवतळे
चंद्रपूर- ताडोबा कोअर झोन मध्ये येणा-या जामणी व नवेगांव या गावाचे पुनर्वसन करतांना गाववासियांसाठी सर्व सोईसुविधा निर्माण कराव्यात असे निर्देश पालकमंत्री संजय देवतळे यांनी दिले. जामणी व नवेगांव या दोन्ही गावांचे पुनर्वसन प्रत्येकी 250 हेक्टर जागेवर होत असून पालकमंत्री देवतळे यांनी जागेची पहाणी केल्यानंतर उपरोक्त निर्देश संबंधित अधिका-यांना दिले. ताडोबा बफर झोनचे उपवनसंरक्षक कल्याणकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार, चिमूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम.बेलेकर, इकोप्रोचे बंडू धोत्रे या दौ-यात उपस्थित होते.
जामणी मधील 93 व नवेगाव मधील 111 कुटूंबे आपले राहाते गांव सोडून नवीन जागेवर स्थलांतरीत होत असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण व त्रास होवू नये यासाठी शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. पुनर्वसित नवीन घरे बांधतांना जुन्या घराचे लाकडी साहित्य आणण्यास वनविभागातर्फे मदत करावी असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री म्हणाले की जामणी व नवेगांवाला प्रत्येकी 250 हेक्टर जमिन दिली असून या जागेवर योग्य पूनर्वसन होत आहे. 250 हेक्टर जमिनी मधून 10 हेक्टर जागेवर प्रत्येक कुटूंबाला 2 हजार चौ.फूट. चे प्लॉट घरासाठी देण्यात आले असून 5 हेक्टर जागा गावठानसाठी राखून ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शाळा, आंगणवाडी, ग्राम पंचायत इमारतीचे काम प्रगतीपथावर असून मुलांना खेळण्यासाठी खाली जागा सोडण्यात आली आहे. त्या जागेवर मुलांना खेळण्याचे क्रीडांगन तयार करुन साहित्य पुरविण्यात यावे असे पालकमंत्री यांनी सांगितले.
उर्वरीत जागेवर प्रत्येक पात्र कुटूंबातील व्यक्तीला 5 एकर जमिन शेतीसाठी देण्यात आली असून त्या जागेवर त्या व्यक्तींनी सांगितल्या प्रमाणे शेती तयार करुन देण्याचे काम सुरु आहे. तसेच गावात गाव तलाव तयार करुन देण्यात आला असून पाण्याची टाकी व लाईटची सुविधा करण्यात आली आहे. या दोन्ही गावातील नागरीकांनी आपले घरे प्रशासनाच्या मदतीने लवकरात लवकर तयार करुन घेवून नवीन गावात राहण्यासाठी यावे असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.
या पहाणी दौ-यात पालकमंत्र्यासह विविध खात्याचे अधिकारी, नवेगांव व जामणी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष अजहर शेख, नानाजी उईके व दोन्ही गावातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.