Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च २५, २०१३

ग्रंथोत्सव व सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप



             
भारती बंधूंच्या सुरेल गायनाने रसिक मंत्रमुग्ध
चंद्रपूर, दि. 25 सुफी संगीतातील सातव्या पिढीचे नेतृत्व करणा-या  भारती बंधूंनी आपल्या बहारदार संगीताचा नजराना सादर करून चंद्रपूरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी संगीताचा आस्वाद घेत टाळ्यांच्या जोरदार गजरात भरभरून दाद दिली. चंद्रपूरकरांनी तीन दिवस गायन, नृत्य व संगीताचा त्रिवेणी संगम अनुभवला.  भारती बंधूच्या सुफी गायनाने सांस्कृतिक महोत्सव व ग्रंथोत्सवाचा समारोप झाला.  अशा प्रकारचे कार्यक्रम नेहमी चंद्रपूरात व्हावे, अशी अपेक्षा चंद्रपूरकर रसिकांनी  व्यक्त केली.  



सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब मैदानावर तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव तथा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी सांस्कृतिक महोत्सव व ग्रंथोत्सवाचे उदघाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्या हस्ते झाले. या तीन दिवसीय कार्यक्रमात हरिहरन यांचे गायन, पार्वती दत्ता यांचे शास्त्रीय नृत्य व भारती बंधू यांच्या सुफी संगीताचा त्रिवेणी संगम चंद्रपूरकरांना अनुभवयास मिळाला. भारती बंधू यांच्या सुफी संगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी विजय वाघमारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एच. डहाळकर, उपविभागीय अधिकारी आशितोष सलील, अहेरीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंग चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण बडकेलवार, तहसिलदार गणेश शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, कार्यक्रम व्यवस्थापक आशिष उके आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
भारती बंधुंनी जीवन का भार सोप दिया तुम्हारे हाथो मे.........या गीताने सुरूवात करून संगीताचे विविध प्रकार सादर करत रसिकांचे मन जिंकले. त्यानंतर सुरज की गरमी से....., मौसे नैना मिलायके........, मोहे अपना बनायके..... अशी एकाहून एक सुफी गीतं सादर करून चंद्रपूरकरांना मंत्रमुग्ध केले. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी टाळ्यांचा जोरदार गजर करून  दाद दिली.  कार्यक्रमात स्थानिक गायक समृध्दी इंगळे, अजय मांडविया, श्री. दारा, सौ. शितल दारा, हिमांशु रंगारी, संदीप कपूर यांनी रोज रोज ऑंखो...., इन्ही लोगो ने ले लिया दुपट्टा मेरा...., अभी मुझमे बाकी है जिंदगी....., इश्क सुफीयाना...., नैना ठगलेंगे......., धुनकी धुनकी लागे......अशी विविध बहारदार गीते सादर करून रसिकांचे मने जिंकले.  त्यांना चंद्रशेखर शर्मा, दिनेश, बंटी, रवी यादव, निखील यांनी संगीताची साथ दिली.
सुफी बंधुंची प्रतिक्रिया
सांस्कृति महोत्सव व ग्रंथोत्सवात तिन्ही दिवस चंद्रपूरकरांसाठी गायन, शास्त्रीय नृत्य व संगीताचा त्रिवेणी संगम घडवून आणल्याबद्दल जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांचे सुफी बंधूंनी कौतुक केले. शासनातर्फे अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम नेहमी आयोजित करण्यात यावे, अशी अपेक्षाही  त्यांनी यावेळी व्यक्त केली.
                   विजय वाघमारे
चंद्रपूर वासियांनी तीन संगीत नृत्य मैफलीचा मनमुराद आनंद लुटावा हेच या महोत्सवातून प्रशासनाला अपेक्षित होते.  यावर्षी महोत्वाला थोडा उशीर झाला.  मात्र पुढील महोत्सव नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये घेण्याचा प्रयत्न राहील अशी प्रतीक्रिया जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी व्यक्त केली.  चंद्रपूर रसिक अतिशय सृजन असून शास्त्रीय संगीत नृत्यांची चंद्रपूरकरांना उत्तम जाण आहे म्हणूनच शास्त्रीय संगीत नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.  ग्रंथोत्सवालाही भरभरुन प्रतिसाद मिळाला असून वाचकांनी 5 लाखांची ग्रंथ खरेदी केली असे वाघमारे म्हणाले.  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.