Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी ११, २०१३

ताडोबात पर्यटनाच्या अद्यावत सुविधावर भर : पर्यटनमंत्री छगन भुजबळ


4 कोटी 7 लक्ष खर्चून पर्यटन निवास उभारणार
चंद्रपूर दि.11- ताडोबा येथे येणा-या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असल्याने त्यांना अद्ययावत सुविधा पुरविण्यासाठी पर्यटन महामंडळाने वनविकास महामंडळाच्या सहकार्याने अनेक नविन प्रकल्प हाती घेतले असून विदर्भ निसर्ग पर्यटन मेगा सर्किट कार्यक्रमाअंतर्गत 4 कोटी 7 लाख खर्चून 18 नवीन कक्षाचे पर्यटक निवास बांधकाम हाती घेण्यात आले आहे.  सोबतच ताडोबा परिसरात 90 लाख रुपये खर्चून तंबू निवास, नेचर ट्रेल उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.   ते मोहूर्ली पत्रकार परिषदेत बोलत होते. 
केंद्र शासनाच्या मेगा सर्कीट कार्यक्रमाअंतर्गत विदर्भ निसर्ग पर्यटनासाठी 45 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात येत असून ही कामे वनविकास महामंडळ व पर्यटन विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ताडोबा येथील पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासात वाढ करण्यासाठी 4 कोटी 7 लाख रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे.  सद्या या ठिकाणी 12 वातानुकूलीत व तीन साधे कक्ष असून त्यात वाढ करुन 18 नवीन वातानुकूलीत कक्षाचे बांधकाम डिसेंबर 2013 पर्यंत होणे अपेक्षित आहे. यानंतर ताडोबा येथे एकूण 30 वातानुकूलीत कक्ष व तीन साधे कक्ष पर्यटकांसाठी उपलब्ध होणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
     चंद्रपूर ते ताडोबा रस्ता दुरुस्त करणे अत्यावश्यक असून या रस्त्यापैकी 9 कि.मी.सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून 36 कि.मी.वन विभागाच्या अखत्यारीत आहे.  या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 20 लाख तर नुतनीकरणासाठी 4 लाख 50 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.  या संदर्भात आपण संबंधीत खात्याचे मंत्री व सचिव यांचेशी चर्चा करुन हा प्रश्न सोडविणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.जंगल सफारीसाठी  मोहुर्ली येथे 27, कोलारा 9 व खुटूंडा 4 अशा 40 वाहनांना जंगल सफारीसाठी परवानंगी असून ती 65 पर्यंत व्हावी यासाठी वनमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिकांना रोजगार मिळावा तसेच पर्यटकांना स्वस्त दरात चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी ब्रेड ॲड ब्रेकफास्ट ही योजना सुरु करण्याचा पर्यटन विभागाचा विचार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. यासाठी आदिवासी खात्याकडून काही योजना राबविता येईल का यावरही विचार करणार असल्याचे भुजबळ म्हणाले. ताडोबा हे जागतिक नकाश्यावर असल्यामुळे जंगल सफारी तसेच राहण्याच्या सुविधा यासाठी पर्यटकांना अडचण होवू नये म्हणून ताडोबाचे बुकींग ऑन लाईन व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
     चंद्रपूर जिल्हयाच्या बृहत पर्यटन विकास आराखडयासाठी जिल्हाधिकारी यांना 5 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची सांगून भुजबळ म्हणाले की, मार्च 2013 अखेर चंद्रपूर जिल्हयाचा बृहत पर्यटन विकास आराखडा तयार होणार आहे.  भद्रावती शहरातील पर्यटन स्थळाचा विकास करणे या अंतर्गत गवराळा येथे 1 कोटी 50 लाख रुपये खर्च करुन धर्म शाळा बांधण्यात येणार आहे.  यासाठीचा निधी सुध्दा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना वितरीत करण्यात आला आहे. 
     चिमूर येथे प्रादेशिक पर्यटन योजनेमधून 1 कोटी 20 लाख मंजूर केले असून हा निधी पर्यटनासंबंधी विविध कामावर खर्च करण्यात येणार आहे.  ब्रम्हपूरी येथे पर्यटन कला व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यासाठी 5 लाख रुपयाच्या निधीस पर्यटन विभागाने मंजूरी दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
            यावेळी नागपूर येथील पर्यटन विकास मंडळाचे  मुख्य अभियंता शैलेंद्र बोरसे, वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे, नागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे  मुख्य अभियंता श्री.सगणे, चंद्रपूर येथील अधिक्षक अभियंता श्री.लुगें, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग उपस्थित होते.          

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.