Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर ०७, २०१२

चंद्रपूरचा अनिरुद्ध "साम टीव्ही' मालिके


देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - गावातील नाटकाच्या रंगमंचावर अभिनय साकारणाऱ्या कलावंताला चंदेरी दुनियेत झळकण्याचे स्वप्न असते; मात्र अनेकांना ते पूर्ण करण्यासाठी मुंबईवारी करूनही पदरी निराशाच येते. तथापि, गुणी कलावंत खचत नाहीत. असाच एक कलावंत आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटांतून प्रेक्षकांपुढे आल्यानंतर आता घराघरांत पोहोचलेल्या "साम टीव्ही' या मराठी वाहिनीवरील "रंग माझा वेगळा' या मालिकेत येतो आहे. अनिरुद्ध वनकर असे या झाडीपट्टीतील कलावंताचे नाव असून, तो सीआयडी पोलिस निरीक्षकाची भूमिका साकारतो आहे. 
महाविद्यालयाच्या स्टेजवर भीमगीते सादर करून आपल्या गोड गळ्याचा सूर ऐकविणारा अनिरुद्ध 16 वर्षांपूर्वी नाटकांत आला. झाडीपट्टीतील प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर त्याने कलेतून छाप पाडली. झाडीपट्टीच्या रंगभूमीत नाट्यकलावंत, दिग्दर्शक, निर्माता आणि गायक अशी पंचरंगी ओळख निर्माण करणारा अनिरुद्ध वनकर गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीत झळकू लागला आहे. "सह्याद्री'वरील "तिसरा डोळा' या मालिकेत त्याला काही भागांत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर "कुलस्वामिनी', "अग्निपरीक्षा' मालिकेत अनिरुद्धने खलनायकाची भूमिका साकारली. गतवर्षी त्याला झाडीपट्टीतच निर्मित "ज्ञानेश्‍वरी एक्‍स्प्रेस', "31 डिसेंबर', "रेला रे' या तीन चित्रपटांत संधी मिळाली. यापूर्वी त्याने "तिचं चुकलं तरी काय?' या चित्रपटात विशेष भूमिका साकारली होती. 
मागील काही दिवसांपासून "साम टीव्ही' या मराठी वाहिनीवर "रंग माझा वेगळा' ही मालिका सुरू आहे. या मालिकेने महिलावर्गाला आपलेसे केले असून, संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. कुटुंबातील एक तरुणी ऑटोचा व्यवसाय यशस्वीरीत्या कशी करू शकते, हे तिच्या धाडसातून दाखविले आहे. याच मालिकेतील पुढच्या काही भागांत चंद्रपूरचा अनिरुद्ध वनकर सीआयडी पोलिस निरीक्षकाच्या भूमिकेत येत आहे. मनीष सामंत असे त्याच्या पात्राचे नाव आहे. एका प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीआयडी पोलिस निरीक्षक "पत्रकार' बनून माहिती गोळा करतो, असे कथानक आहे. ही मालिका रात्री आठला सोमवार ते शुक्रवारी प्रसारित होत असते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.