Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल २३, २०१०

200 झोपड्यांवरून जाणार रिंगरोड

सकाळ वृत्तसेवा
Thursday, April 22, 2010

चंद्रपूर - शहराच्या बाहेरून होऊ घातलेल्या रिंगरोडमुळे नेहरूनगर परिसरातील सुमारे 200 झोपड्या हटविण्यात येणार आहेत. या रस्त्याचे बांधकाम सुरू झाले असून, या परिसरात खोदकाम करण्यात येत आहे. दरम्यान, या झोपड्या हटविण्यासंदर्भात कोणतीही सूचना पालिकेने दिलेली नाही. त्यामुळे येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना बेघर होण्याची पाळी आली आहे.

औद्योगिक क्षेत्रातून होणारी जडवाहतूक शहरातून असल्याने अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. त्यावर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने शहराबाहेरून रिंगरोड निर्मितीचा प्रस्ताव मागील चार वर्षांपूर्वी आखण्यात आला. मात्र, कंत्राटदार काम सोडून पळाल्याने रस्त्याचे बांधकाम अर्धवट राहिले. गेल्या महिन्यापासून ते पूर्ववत करण्यात आले असून, विधी महाविद्यालय ते वनराजिक महाविद्यालयापर्यंत रस्ता बांधकाम केला जात आहे. नेहरूनगरातून जाणारा हा रस्ता अगदी झोपडपट्टीतून जातो. त्यामुळे येथील सुमारे 200 झोपड्यांना हटविल्याशिवाय पर्याय नाही. येथे असलेल्या नाल्यावर पूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे झोपड्या उद्‌ध्वस्त होतील, हेही तितकेच सत्य आहे. मोलमजुरी, घरकाम आणि भांडीधुणी अशी कामे करून उदरनिर्वाह करणारी सुमारे 200 कुटुंबे नेहरूनगरात आहेत. कुडामातीने बांधलेल्या झोपड्यांमध्ये ते गेल्या 11 वर्षांपासून जीवन जगत आहेत. गृह, पाणी आणि वीज या करांचा भरणाही गेल्या तीन वर्षांपासून पालिकेकडे केला जातो. मात्र, येथे कोणत्याही मूलभूत सुविधा आलेल्या नाहीत. रस्ता, वीज आणि पाणी यापैकी कोणतीही व्यवस्था येथे करून देण्यात आलेली नाही. असे असतानादेखील येथील नागरिक जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच हा रिंगरोड झोपड्यांना उद्‌ध्वस्त करणार आहे. त्यामुळे राहायचे तरी कुठे? असा प्रश्‍न येथील लक्ष्मण ठाकरे, गुलाब डुकरे, श्रीधर पेंदोर, शंकर बोरकर, उत्तम साखरकर, ऋषी नागोसे यांना पडला आहे. झोपड्या पाडण्यात येणार असल्याचे सत्य असले तरी झोपडपट्टीवासीयांना कोणतीही लेखी सूचना पालिकेने दिली नाही. केवळ कंत्राटदाराच्या तोंडी सूचनेतून त्यांना घर खाली करण्याचे बजावले जात आहे. यासंदर्भात येथील नागरिकांनी वॉर्डाचे नगरसेवक विठ्ठल डुकरे यांच्याकडे धाव घेतली. मात्र, त्यांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.