चंद्रपूरच्या संघ शिक्षा वर्गाचा समारोप
चंद्रपूर/प्रतिनिधी:
उपस्थिताना संबोधित करताना प्राचार्य बलबीरसिंग गुरौ बाळासाहेब चौधरी
तर मंचावर बाळासाहेब चौधरी, अॅड. रवींद्र भागवत, श्रीधर गाडगे
संघाचे प्रशिक्षण वर्ग हे शाखा निट चालविण्यासाठी असतात. या प्रशिक्षण वर्गातून प्रशिक्षण घेतलेले स्वयंसेवक माणूस घडविण्याचे कार्य करीत असतात. मागील 90 वर्षांपासून संस्कारक्षम माणूस घडविण्याचे कार्य संघाने अविरत केले आहे. त्यामुळे देशावर आलेल्या कुठल्याही संकटकाळात स्वयंसेवक सर्वात पुढे असतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाहक बाळासाहेब चौधरी यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांताचा चंद्रपूर महानगरातील प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप सोमवार, 3 जून रोजी, सायंकाळी ६.३० वाजता येथील तुकूम परिसरातील विद्या विहार कॉन्व्हेंट येथील संघस्थानावर झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर येथील श्री गुरुद्वारा गुरुसिंघ सभेचे सचिव प्राचार्य बलबीरसिंग गुरौ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघचालक अॅड. रवींद्र भागवत, वर्गाधिकारी श्रीधर गाडगे प्रभृती व्यासपीठावर उपस्थित होते.
चौधरी पुढे म्हणाले, संघ शाखेच्या माध्यमातून स्वयंसेवक एकत्र येत असल्याने तो घडत आहे. 1974-75 मध्ये आणिबाणीच्या काळात सत्याग्रह करण्यात आला होता. त्या सत्याग्रहींमध्ये सर्वाधिक अटक झालेले कार्यकर्तेच संघाचे होते. तसेच 1983 साली झालेल्या लातूर भुकंपामध्ये मदतीसाठी प्रथम धावून जाणारे संघ कार्यकर्ते होते, अशीही माहिती त्यांनी दिली. शाखेमध्ये संस्कार शिकविले जातात. त्यामुळे कुठल्याी आणिबाणीच्या प्रसंगात न डगमगता कार्य करण्याची शैली संघ कार्यकर्त्यांमध्ये आहे. आज स्वयंसेवकांव्दारे अनेक सेवाकार्य समाजात सुरू आहे.
बलबीरसिंग गुरौ म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साधी राहणी व उच्च विचारसरणी या जीवनशैलीने मला फारच प्रभावित केले. संघाने युग परिवर्तनाचे कार्य केले आहे. यापुढे संघ कार्यकर्त्यांकडून अपेक्षा वाढल्या असल्याने त्यांच्या जबाबदार्याही वाढल्या आहेत.
या वर्गात विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांतील 155 स्थानांवरून 266 शिक्षार्थी सहभागी झाले होते. त्यात दहावीचे 101, कनिष्ठ महाविद्यालयाचे 98, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे 49 आणि 18 व्यवसायिक स्वयंसेवकांचा समावेश होता. 14 मे रोजी दुपारपासून वर्गासाठी स्वयंसेवकांचे एकत्रिकरण सुरू झाले होते, तर 15 मे रोजी पहाटेपासून या वर्गाला सुरूवात झाली.
श्रीधर गाडगे यांनी, 1927 पासून संघाच्या शिक्षा वर्गाला सुरूवात झाली. माणूस घडविण्याचे तंत्र स्वयंसेवकांमध्ये विकसित करण्यासाठी हे वर्ग सुरू करण्यात आले. चंद्रपूर महानगरात मागील 20 दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रशिक्षणात 266 विद्यार्थ्यांनी अखंड साधणेचे व्रत घेवून हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशी माहिती प्रास्ताविकातून दिली.
तत्पूर्वी, सुभाषित व वैयक्तीक गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आ. नाना श्यामकुळे, मनपाचे उपमहापौर अनिल फुलझेले यांच्यासह स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.