Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

वामनराव.चटप लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वामनराव.चटप लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, मे १३, २०१८

अँड.वामनराव चटप यांचे खुले पत्र;विधानसभा लढवण्याचा निर्धार

अँड.वामनराव चटप यांचे खुले पत्र;विधानसभा लढवण्याचा निर्धार

प्रिय बंधू-भगिनींनो...

     माझ्या ६६ व्या जन्मदिनाला आपण दिलेल्या शुभेच्छांनी पुढील कार्यास उर्जा मिळाली आहे. माझे आयुष्य हे मी तुमच्यासाठी समर्पित केले असल्याने मागे वळून पाहताना मला एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलावर आपण जे प्रेम केलं, त्याची प्रकर्षाने आठवण होत आहे. तुमचं माझ्यावर असलेल प्रेम आणि विश्वास मी सातत्याने अनुभवत असतो. आज याप्रसंगी आपल्यातील गेल्या ४० वर्षातील चिरंतर नात्यासंबंधी माझ्या मनात असलेली कृतज्ञतापूर्वक भावना व्यक्त करण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे.
            गेल्या ४० वर्षांपासून मी सार्वजनिक जीवनात सक्रीय आहे. मुळातच शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव माझ्या मनात खोलवर बिंबली होती. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझ्या शिक्षणाचा फायदा समाजातील शोषित-वंचित घटकांना मिळावा या उदात्त हेतूने शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली १९८० पासून मी सार्वजनिक जीवनात सक्रीय झालो. आपण सर्वांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन वेळोवेळी जी मला साथ दिली ती माझ्या कायम स्मरणात राहील. आपल्यामुळेच मी राज्यभर शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात यशस्वी आंदोलने उभारू शकलो आणि विदर्भ राज्य मागणीच्या आंदोलनाचे नेतृत्व सांभाळू शकत आहे. आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी अविरत झटणाऱ्या आपल्यासारख्या निस्वार्थ कार्यकर्त्यांमुळेच..!
         मला आपण तीनदा महाराष्ट्र विधानसभेत आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. आमदार असताना आपली मान शरमेने खाली झुकेल असे कुठलेही कार्य मी केले नाही आणि यापुढेही करणार नाही. मोठ्या पदांचे, पैशांचे आमिष दाखविण्याचे अनेकदा प्रयत्न झालेत परंतु आपल्या सर्वांचा माझ्यावर असलेल्या विश्वासाने मी कधीही कार्यकारणभाव दूर सारला नाही आणि पद-पैश्यांना बळी न पडता आपला साथी बनून सातत्याने कार्य केले. कुठलेही काम करताना ‘माझ्यावर विश्वास ठेवणारा सर्वसामान्य कार्यकर्ता’ हाच केंद्रबिंदू ठेऊन मी कार्य करतो. मी नेता नाही तर मी ‘फिल्ड वर्कर’ आहे.  
             राजकारणात अनेक चढ-उतार बघितले, पराभवांचा सामना केला परंतु पडत्या काळात देखील आपण माझ्या सोबत कायम राहिलात म्हणूनच आज मी आनंदाने वयाच्या ६६ व्या वर्षी देखील आपल्यासाठी लढत आहे. केवळ माझे वय वाढत आहे परंतु मी मनाने अजूनही तरुण आहे. दरम्यानच्या काळात ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला आणि ज्या तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पदे देऊन प्रतिष्ठा मिळवून दिली त्यातील काही सहकारी माझ्याकडे आमदारकीचे पद नसताना सोडून गेले. त्यांच्या अशा सोडून जाण्याने माझ्या मनाला यातना झाल्यात, परंतु तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पद-प्रतिष्ठा मिळवून देता आली याचा मला आनंद आहे. आज ते माझ्यासोबत नसले तरी मी कायम त्यांचे हित चिंततो. मी पदावर असो किंवा नसो पण जे माझ्या कायम सोबत राहिले अशाच कार्यकर्त्यांना आगामी काळात प्राधान्य दिले जाईल.  
           रास्ता रोको, जेल भरो, सविनय कायदेभंग, देश बचाव अभियान, रेल रोको अशा नानाविध आंदोलनात जे कार्यकर्ते- हितचिंतक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत किंबहुना वेळप्रसंगी लाठीचार्ज सहन केला आणि तुरुंगवासही भोगला त्या सर्वांच्या मी कायम ऋणात राहील. निवडणुका लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. निवडणूका आणि त्यातून मिळणारी पदे या कायमस्वरूपी बाबी नाहीत. परंतु समाजाभिमुख कार्य करण्याची उर्जा मात्र कायम राहायला हवी. ही उर्जा मला आपल्या प्रेम, आपुलकी आणि स्नेहातून मिळत असते. मला अनेक लोक विचारतात की, “तुम्हाला थकवा येत नाही का ?” माझे या प्रश्नाला प्रामाणिक उत्तर असे आहे की, “आपण जे काम करतो त्यातून आनंद मिळत असेल तर त्या कामात कधीही थकवा येत नाही.” महात्मा फुले ते युगात्मा शरद जोशी यांनी जे शोषितांच्या हिताचे विचार मांडले आहेत त्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. शेतकरी संघटना ही माझी आई आहे आणि जनसेवा हे मी माझे कर्तव्य समजतो.  
            माझ्या आमदारकीच्या काळात केलेल्या कामांची जाहिरात कधी केली नाही. किंबहुना तशी गरज देखील भासली नाही. परंतु आजच्या बदलत्या परिस्थितीनुसार नवमतदारापर्यंत माझ्या आमदारकीच्या काळात झालेल्या कार्याची माहिती पोहचविणे गरजेचे झाले आहे. त्याकाळात विदर्भातील २२७ गावांतील भूमी धारकांना मालकी हक्क मिळवून देण्यात आलेले यश, तुकडेबंदी कायद्याखाली ‘तूकडा’ या शब्दाची व्याख्या बदलवून मध्य विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांवर ३० वर्षांपासून होत असलेल्या अन्यायाविरोधात न्याय मिळवून देण्यात आलेले यश, दारूबंदीसंदर्भात विविध जीआर शासनाला काढण्यास भाग पाडून राज्यातील शेकडो दारूचे दुकान बंद करण्यात आलेले यश, जिवती तालुक्यातील मोठमोठे डोंगर फोडून रस्ते बांधणी आणि आरोग्य-वीज-शिक्षण-पाणी अशा मुलभूत सुविधा पोहचविण्यात आलेले यश अशी नानाविध विकासकामे करून राजूरा विधानसभा क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणता आले याचे सर्व श्रेय राजूरा विधानसभा मतदार संघातील सुज्ञ मतदारांनाच जाते. कारण आपण जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळेच मला हे करता आले. आज आपल्या भागात वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे वंचित-शोषित घटकांचा आवाज विधानसभेत जाणे गरजेचे वाटू लागले आहे त्यामुळे आपल्या आग्रहाने येणारी विधानसभा निवडणूक मी लढविणार आहे. केवळ निवडणुकांपूरता विचार न करता ‘विचारांची लढाई जिवंत राहिली पाहिजे’ आणि आपल्या समस्यांची सोडवणूक झाली पाहिजे यासाठी येणारा काळ हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे.
             येणाऱ्या काळात आपल्यासमोर आव्हान मोठे आहे. परंतु एकीने आणि नेकीने आपण लढत राहिलो तर सत्याचा विजय निश्चित होईल, हा विश्वास मला आहे.
“साथी हाथ बढाना..
एक अकेला थक जाएगा
मिलकर बोझ उठाना..”
इतकीच अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो आणि एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलावर आपण जे प्रेम करत आलात त्याबद्दल जो पर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तो पर्यंत मी आपल्यासाठी लढत राहील इतकाच शब्द देतो.
जय विदर्भ! जय जवान-जय किसान! धन्यवाद!
                                                                                                                                     आपला
​​अ‍ॅड. वामन सदाशिवराव चटप

-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).