ग्रामायण उद्यमगाथा मध्ये विनोदराव राजगुरे
वास्तविक अंबाडी, कवठ, शेवगा, आवळा, बेलफळ, करवंद, चिंच आदी रानभाज्या व त्यांच्या पासून तयार होणारे अन्य उत्पादन आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी आहेत. परंतु त्यांच्या गुणधर्माचा प्रसार व प्रचार नसल्याने शेतकरी त्यांचे पीक घ्यायला धजावत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पासून तयार होणाऱ्या उत्पादनांचा व गुणवत्तेचा प्रचार केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल ,असे विचार ग्रामायणच्या उद्यम गाथा कार्यक्रमाच्या ३३ व्या भागात बोलतांना श्री विनोद राजगुरे यांनी व्यक्त केले. श्री राजगुरे शैक्षणिक दृष्ट्या इंजिनिअर आहेत. त्यांनी कांही वर्षे नोकरी सुद्धा केली. मुळातच मनात कल्पकता असल्याने्,त्या मर्यादित क्षेत्रात त्यांचे मन रमले नाही. त्यांनी वर्धेच्या सेंटर आँफ सायन्स फाँर व्हिलेजेस मधून प्रशिक्षण घेतले. त्यांना अंबाडी पासून होणाऱ्या उत्पादनात रुची वाटली. सेवाग्राम येथील बापू कुटीत अंबाडीचे सरबत त्यांनी बघितले व अंबाडीपासून होणाऱ्या अन्य उत्पादनांचा विस्तार करण्याची योजना आखली.
२०१०साली त्यांनी आपल्या उद्योगाची (श्रीराम फूड प्रोडक्ट्स) नोंदणी "खादी व्हिलेज इंडस्ट्रीज काँर्पोरेशन (केव्हिआयसी) मध्ये केली. त्यामुळे बँकेकडून व महामंडळाकडून आर्थिक सहाय्य मिळाले. सर्वप्रथम त्यांनी अंबाडीच्या सरबताची निर्मिती केली. त्यात त्यांना चांगला प्रतिसाद पण मिळाला. त्यांच्या मते अंबाडीच्या झाडाच्या प्रत्येक भागापासून कांहीतरी उत्पादन होते. पानं,फुले, बिया,पाकळ्या, देठ या सर्वांची उपयोगिता आहे. आज ते अंबाडीपासून सरबत, जाम, जेली, चटणी, बेसन आदी उत्पादन घेतात. खादी ग्रामोद्योग तथा ग्रामायणच्या प्रदर्शनाव्दारे त्यांनी आपल्या उत्पादनांची ओळख लोकांपर्यंत पोहचली. सामान्य उद्योजकांना अशा प्रदर्शनी वरदान ठरतात हे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. त्यांची उत्पादने बाजारात आज "चिअर अप प्राँडक्टस" या ब्रांड नावाने ओळखल्या जातात.
त्यांच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या मालाच्या विक्रीची खात्री झाली आहे. आज गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात ८ ते १० शेतकरी जवळपास १०० एकर मध्ये अंबाडीची लागवड करतात. त्यांना पाकळी व बियाणे यापासून एकरी ५० ते ५५ हजार उत्पन्न होते. याशिवाय पानांपासून मिळणारे उत्पन्न अलग आहे.अंबाडीच्या झाडावर कीड तर लागत नाही शिवाय ते अन्य पिकांचे कीटकांपासून संरक्षण करते. या अनुभवावरुनच त्यांनी मत व्यक्त केले की इतर रानभाज्यांचे लाभ व उत्पन्नाची खात्री शेतकऱ्यांना मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेत नक्कीच सुधारणा होईल. सरकार यासाठी मदत करते परंतु कमी आहे ती प्रचाराची. ग्रामायण चे योगदान त्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
नवीन तरुणाईला संदेश देतांना ते म्हणाले की आज नोकऱ्या नसल्याने स्वतः चा उद्योग सुरु करून इतरांना रोजगार द्या. ध्येय आणि कष्ट यांची जोड झाल्यास यश नक्की मिळेल.
कार्यक्रमाचे आरंभी श्री राजेंद्र काळे यांनी ग्रामायणची पार्श्वभूमी सांगत पाहूण्यांचे स्वागत केले तर श्री प्रशांत बुजोणे यांनी श्री विनोद राजगुरे यांची मुलाखत घेतली. आजच्या कार्यक्रमातून अंबाडी सारख्या भाजीचे फायदे व त्यापासून तयार होणारे अन्य उत्पादने यांची माहिती दर्शकांना झाली.
Legumes like Flax, Kawath, Shevaga, Amla, Bellfruit, Karwand, Chinch etc.