येत्या 5 वर्षात सर्व प्रकारचे प्रदूषण कमी करण्यासंदर्भात आतंरराष्ट्रीय मानक नागपूर शहर पूर्ण करेल -
केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर 1 ऑगस्ट 2021
नागपुरातील जल, वायू, ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक इंधन - सीएनजी,एलएनजी. ,इथेनॉलचे पंप उघडण्यात येत असून इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनही उभारले जात आहे . येत्या 5 वर्षात सर्व प्रकारचे प्रदूषण कमी करण्यासंदर्भात आतंरराष्ट्रीय मानक नागपूर शहर पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करीत नागपूर देशातील सर्वात सुंदर आणि हरित शहर निर्माण होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. . नागरिकांनीही 'हरित नागपुर ' बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले . ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनद्वारे आयोजित महावृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज मिहानमधील भारतीय आयुर्विविज्ञान संस्था- एम्स येथे झाले त्यावेळी ते बोलत होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम्सच्या संचालिका डॉ. विभा दत्ता होत्या तर नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी,खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार नागो गाणाार, आमदार परिणय फुके, ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सांडपाणी प्रक्रीया व्यवस्थापन, ग्रीन बस, सीएनजी, एलएनजी असे विविध प्रकल्प पहिल्यांदा राबवून आपण नागपूर शहराला 'इको फ्रेंडली' केले असून आता शहराला ध्वनीप्रदूषण मुक्त करण्याची जबाबदारी जनतेसह आपण सर्वांची आहे, असे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले.
नागपुरातील ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन तर्फे पूर्व विदर्भात यंदा 50 हजार वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एम्सच्या परिसरत वृक्षारोपण करून वृक्ष लागवड आणि संवर्धन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .
प्रा. अनिल सोले यांनी ग्रीन अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षलागवड, वृक्षसंवर्धनाचे मोठे काम केले आहे. त्यांनी आता परिवहन क्षेत्राकडे लक्ष द्यावे आणि गाड्यांच्या हॉर्नच्या आवाजांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करावे, जेणेकरून ध्वनी प्रदूषण कमी होईल, असे ग्रीन अर्थ फाउंडेशनच्या कार्याचे कौतूक करताना नितीन गडकरी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिल सोले यांनी केले. त्यांनी यावेळी ग्रीन अर्थच्यावतीने मागील सात वर्षांपासून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. वृक्षदिंडीच्या माध्यमातून पूर्व विदर्भात आजपर्यंत जी झाडे लावण्यात त्यांचे संवर्धन करण्यात येत असून आगामी काळात 50 हजार झाडे लावण्यात येतील असा संकल्प त्यांनी यावेळी केला. ज्या भागात झाडे लावण्यात येतील, त्यांना जिओ टॅगींग करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमाला एम्सचे विद्यार्थी , शिक्षक कर्मचारी, ग्रीन अर्थ संस्था, रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.