अभिनेते दिलीपकुमार आणि चंद्रपूरचे नाते जुने. आज त्यांचे निधन झाले आणि चंद्रपूरच्या या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. स्व. जयंत मामीडवार यांनी सिनेसृष्टीतील अभिनय सम्राट दिलीपकुमार यांना चंद्रपूरला बोलाविले होते आणि ताडोबात दिवसभर फिरवलं. “इस जंगल के हम दो शेर’ असे म्हणत जयंतरावांनी दिवसभर दिलीपकुमार यांना ताडोबात फिरवल्यावर “चल घर जल्दी हो गयी देर’ म्हणत सायंकाळी परत आले होते.
चंद्रपुरात 1940 च्या काळात जयंत टॉकीजची स्थापना दादाजी मामीडवार यांनी केली. त्यांचे पुत्र जयंत मामीडवार यांनी पदवीच्या शिक्षणानंतर सिनेमागृहाची धुरा हाती घेतली. बालपणी कर्जापोटी जयंत टॉकीजचा लिलाव होणार होता. हा क्षण जयंतरावांनी अत्यंत हतबलतेने बघितला आणि चित्रपटगृह चालविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी केवळ सांस्कृतिक क्षेत्रातच न रमता क्रीडा क्षेत्रातही योगदान दिले. मामीडवार कुटुंबीय प्रत्येक कलावंताचे थाटात आदरातिथ्य करायचे. 1983 मध्ये लालबहादूर शास्त्री बॅटमिंटन स्पर्धेसाठी त्यांनी दिलीप कुमार, संजीव कुमार, जॉनी वॉकर यासारख्या कलावंतांना चंद्रपूरला आणले होते. त्याचवेळी दिलीपकुमार यांनी संपूर्ण एक दिवस ताडोबात घालविला होता. त्यावेळी ताडोबा व्याघ्रप्रकल्प म्हणून नावारूपास आले नव्हते. पण, अभियनातील वाघ त्यापूर्वीच ताडोबात आला होता, हे कदाचित नव्या पिढीला माहीत नसावे. ताडोबाचे वनवैभव पाहून दिलीपकुमार अक्षरशः भारावले. तासाभराच्या फिरस्तीसाठी गेलेले दिलीपकुमार नंतर दिवसभर तिथेच रमले. यावेळी त्यांनी जयंतरावांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. दिलीपकुमार आणि जयंतरावांच्या भेटीचा हा “नया दौर’ तेव्हाच सुरू झाला. पण, आज दोन्ही मित्र जग सोडून गेलेत.