नागपूर जिल्हयातील दोन कोरोना योद्धा सरपंच्यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद
नागपूर, दि. 11:- चार गट ग्रामपंचायतीची एकमेव कारभारी असणारी युवा सरपंच नलिनीताई शेरकुरे यांच्या ‘सरपंच आपल्या दारी’, या मोहिमेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. नागपूर जिल्ह्यातील दोन सरपंचांनी आज दूरस्थ प्रणालीद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत संवाद साधला. कोरोना काळामध्ये या दोन्ही सरपंचांनी उत्कृष्ट कार्य केले आहे.
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यामधील ग्रामपंचायत पिपळधरा अंतर्गत कटंगधरा, मांडवा, (मार ) नागाझरी व पिपळधरा अशा चार गावांची ( गट ग्रामपंचायती ) धुरा सांभाळणारी नलीनीताई शेरकुरे आणि नागपूर तालुक्यातील शिरपूर या गावचे सरपंच गौरीशंकर गजभिये या दोघांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी थेट संपर्क साधला. कालमर्यादेमुळे प्रत्यक्ष बोलण्याची संधी श्रीमती नलिनीताई शेरकुरे यांना मिळाली.
1617 लोकसंख्येच्या चार गटग्रामपंचायती असणाऱ्या गावात प्रत्येक घराशी संपर्क साधून या महिलेने गावामध्ये लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली. चार टीम करून त्यांनी सर्वांशी संपर्क ठेवला. ‘सरपंच आपल्या दारी’ या अभिनव प्रयोगातून त्या प्रत्येकाच्या संपर्कात राहिल्या. त्यामुळे हे गाव कोरोना प्रकोपापासून अलिप्त राहू शकले. आपल्या ओघवत्या शैलीत त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना या कामाची कल्पना दिली. मुख्यमंत्र्यांनी टाळ्या वाजवून आदिवासी भागात काम करणाऱ्या या सरपंच भगिनीचे स्वागत केले.
नागपूर जिल्ह्यातील शिरपूर येथील सरपंच गौरीशंकर गजभिये यांनी देखील 848 लोकवस्तीच्या गावांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी केली. आदिवासीबहुल या गावामध्ये लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
या दोन्ही गावांच्या सरपंचासोबतच शिरपूर गावचे सचिव सुनील जोशी, पिपळधरा गावाचे सचिव एम. बी. उमरेडकर हे देखील आजच्या या दूरस्थ प्रणालीद्वारे झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत सुरेंद्र भुयार हे या संवादाचे वेळी उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 62 गावे कोरोना मुक्त राहिली आहे. तर काही गावांनी आपली गावे कोरोनापासून अलिप्त राहण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले आहे. पिपळधरा व शिरपूर या दोन गावातील प्रयोगही असेच अभिनव होते.
मुख्यमंत्र्यांनी आज महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती व औरंगाबाद विभागातील अशा अभिनव प्रयोग करणाऱ्या सरपंचांकडून त्यांच्या भाषेत त्यांच्या यशकथा ऐकून घेतल्या. यासर्वांचे कौतुक केले. तसेच कोरोना काळात सरपंच नव्हे शासनाचे सहकारी बनून खांद्याला खांदा लावून लढल्याबद्दल आभारही व्यक्त केले. सरपंच्यानीही मुख्यमंत्र्यांनी थेट संवादाची संधी दिल्याबद्दल आभार मानले.