Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी ०२, २०२१

आणि अविश्वास प्रस्ताव सभागृहाने फेटाळून लावला

     ओळख कर्तृत्वाची 2    

कर्मवीर मा. सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार 


 

मा.सा.कन्नमवार मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास 305 दिवसांनी त्यांचेवर अविश्वास ठराव मांडण्यात आला. त्यासाठी विधानभवनात तत्कालिन विधानसभा अध्यक्ष त्र्यं.शि.उर्फ बाळासाहेब भारदे यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली. ठरावावर सन्माननीय सभासद पी.डी.रहांगदाळे, एस.के.वानखेडे, ए.एच.ममदानी, आचार्य अत्रे, एस.जी.पाटकर आणि इतरही काही सभासदांनी भाषणे केलीत. या भाषणाद्वारे अनेकांनी कन्नमवारांवर टिका केली. दादासाहेब कन्नमवारांनी संपूर्ण भाषण अगदी शांतपणे एकूण घेतले. ठरावावर जवळपास साडेबारा तास चर्चा चर्चा झाली.त्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी दादासाहेब कन्नमवारांनी सन्माननीय अध्यक्षांना परवानगी मागितली,  ते म्हणाले, पूर्वीचे मुख्यमंत्री श्री.यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेल्यामुळे महाराष्ट्र राज्याचा कारभार माझ्यावर सोपविला.20 नोव्हेंबर 1962 रोजी मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कारभार हाती घेतला.त्याला आज 305 दिवस झालेत. आज माझ्यावर अविश्वासाचा ठराव आणला आहे. सन्माननीय सभासदांनी माझेवर टिका केली, त्यांना उत्तर देण्यासाठी मी तयार आहे.

त्यावर एक सदस्य म्हणाले, " या सरकारने एक जरी गोष्ट चांगली केली आहे असे समजले तरी मी या ठरावावर सही केली नसती व चर्चेत सामील झालो नसतो, त्यावर कन्नमवार उत्तरले, " या सरकारने गेल्या सहा महिन्यात एक नव्हे तर अनेक चांगली कामे केलीत हे मी सांगणार आहे, तेव्हा ते ठरावावरील मतदानाच्या वेळी तटस्थ राहतात किंवा नाही ते मला पाहावयाचे आहे"


दुसरा आक्षेप, महाराष्ट्र राज्यातील निरनिराळ्या विभागात भावनात्मक ऐक्य निर्माण करण्याच्या द्रुष्टीने प्रयत्न करण्यात आलेले नाही असा होता, त्यावर कन्नमवारांनी म्हणाले, सर्व विभागांना लागू होतील असेच कायदे आम्ही बनविले. कित्येक कायद्यांचे युनिफीकेशन केले. सर्व राज्यासाठी एक एस.टी. कॉर्पोरिशन केले, एकच को-ऑपरेटिव्ह बँक करण्यात आली, संबध प्रदेशासाठी इटंक ची एकच संस्था निर्माण केली, ह्या सर्व गोष्टी भावनात्मक ऐक्य निर्माण करणे आणि वाढविणे यासाठी असून विरोधकांनी भावनात्मक ऐक्य सरकारने काहीच केले नाही हे म्हणणे निराधार आहे.

त्यानंतर प्राथमिक शिक्षकांचा प्रश्न उपस्थित झाला. प्राथमिक शिक्षकांसाठी एकुण मंजूर झालेल्या खर्च्याच्या 50 टक्के अनुदान नागपूर कॉर्पोरेशन देण्यात आले. 3 लाख रुपये अँडहॉक ग्रँट म्हणून देण्याचा सरकारच्या निर्णय असल्याचा सांगीतले.वास्तविक अशी मदत पुणे, मुंबई किंवा राज्यात इतर कुटेही देण्यात आलेले नाही असे असूनही सरकारने विदर्भातील शिक्षकांसाठी काहीच केले नाही हे म्हणने निरर्थक असल्याचे सभागृहात पटवून दिले.


मंत्र्याच्या दौऱ्याबद्दल सभागृहात नेहमी प्रश्न उपस्थित केले जातात त्यासंबंधी कन्नमवार म्हणाले, विरोधी पक्ष सदस्यांचा असा दावा आहे की मंत्री व उपमंत्री दौरे काढून हजारो रुपये कमवीतात. मंत्र्यांनी दौरे करु नयेत व नेहमी मुंबईतच राहावे काय ? मुंबई शहरातून फारच थोडे प्रतिनिधी निवडून आले आहेत.आपला महाराष्ट्र हा खेड्यापाड्यातून पसरलेला आहे. म्हणून खेड्यापाड्यात जाऊन काम करण्यासाठी दौरे काढावीच लागतील व जनसंपर्क ही वाढवावा लागते.


एका सदस्याने सांगितले की, मुख्यमंत्री मुंबईला राहताच नाहीत. या संदर्भात कन्नमवारांनी 305 दिवसांच्या मुख्यमंत्री काळाचा हिशोब दिला. ते म्हणाले की, " 305 दिवसापैकी 198 दिवस मी मुंबई शहरात होतो, फक्त 107 दिवस दौऱ्यावर होतो, दर बुधवारला मंत्री मंडळाची बैठक असते. या 305 दिवसांच्या काळात एकूण 34 बैठकी झाल्या.ह्या 34 ही बैठकीना मी हजर होतो " असे स्पष्ट करून त्यांनी टिकाकारांना निरुत्तर केले.


शेवटी कन्नमवारांनी सांगितले की, आमच्या मंत्रीमंडळात कोणीच भांडवलदार नाही.मी आज राज्याचा "मुख्यमंत्री" असलो तरी पूर्वीचा साधा व्रूत्तपत्र विकणारा होतो. यामागे हेतू इतकाच होत की, ह्या राज्याच्या मंत्रिमंडळात बहूतेक लोक शेतकरी कामगार वर्गातून आलेले असून त्यांच्यावर आरोप करण्यासारखे कोणी महाल अथवा बंगले बांधलेले नाही तेव्हा मंत्रिमंडळावर करण्यात येणाऱ्या टिकेत काहीच अर्थ नाही.

शेवटी अविश्वासाच्या ठरावावर मतदान घेण्यात आले. प्रस्तावाच्या बाजूने 36 मते पडली आणि विरुध्द बाजूने 187 मते पडली. विरोधी पक्षाने कन्नमवारांवर आणलेला अविश्वास प्रस्ताव सभागृहाने फेटाळून लावला.

अविश्वासाच्या ठरावावरील संपूर्ण भाषणावरून असे लक्षात येते की, कन्नमवारांनी समर्पकपणे, दूरदृष्टी ठेऊन, मुद्देसूद निरनिराळी योग्य उदाहरणे देऊन शांतव्रुत्तीने विरोधी पक्ष सदस्यांना उत्तरे दिली. अविश्वासाच्या ठरावावर त्यांनी धैर्य व मनाचा समतोलपणा ढळू दिला नाही.यावरून त्यांची संयमी व्रुत्ती दिसुन येते.


 

- खिमेश बढिये (नागपूर) 

  प्रचारक,   दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती नागपूर

8888422662, 9423640394


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.