Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर १९, २०२०

विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार मा. गो. वैद्य यांचे निधन





नागपूर, 19 डिसेंबर
विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे शनिवार 19 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 3.30 वाजता निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चाेत पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) व बराच मोठा आप्त परिवार आहे.
×अंत्ययात्रा रविवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता त्यांचे राहते घर- 80, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर-22 येथून निघेल व अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील..



मा.गो. वैद्य किंवा बाबूराव वैद्य हे संस्कृतचे व्यासंगी विद्वान आहेत. त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील तरोडा या गावी १९२३ साली झाला.
मा.गो. वैद्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण तरोड्यात आदितवार दरवाजा प्राथमिक शाळेत झाल्यानंतर त्यांच्या मावसकाकाने त्यांना नागपुरात पुढील शिक्षणासाठी आणले. अकरावी मॅट्रिकनंतर १९३९ साली त्यांनी नागपूरमधीलच मॉरिस कॉलेजमध्ये बी.ए.साठी प्रवेश घेतला. संस्कृत व गणित हे विषय घेऊन त्यांनी बी.ए.ची परीक्षा विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. संस्कृत विषयात एम.ए. करण्यासाठी त्यांना किंग एडवर्ड मेमोरियल शिष्यवृत्ती मिळाली.


एम.ए.झाल्यावर मा.गो. वैद्य न्यू इरा हायस्कूल(आता, नवयुग विद्यालय) या शाळेत शिक्षक म्हणून लागले. त्या सुमारास याचदरम्यान महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांनी डॉ. रघुवीर यांना संस्कृत कोशासाठी दोन मदतनीस हवे आहेत, असे कळल्यानंतर न्यू इरा हायस्कूलमधील नोकरी सोडून त्यांनी संस्कृत कोषाचे काम सुरू केले. मात्र काही कारणाने हे काम सोडावे लागले.

पुढची नोकरी कुर्वे स्कूल मध्ये गणिताचे शिक्षक म्हणून आणि त्यानंतरची पब्लिक सर्विस कमिशनच्या ऑफिसात. १९४९ साली ते नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून लागले. मा.गो. वैद्यांनी सलग १७ वर्षे हिस्लॉप कॉलेजमध्ये इंग्रजी माध्यमातून संस्कृतचे अध्यापन केले. त्यांचे मराठी प्रमाणेच संस्कृत-इंग्रजीवर अद्भुत प्रभुत्व होते. त्यांनी १९६६मध्ये कॉलेजची नोकरी सोडली.


मॉरिस कॉलेजमध्ये असताना १९४३ सालापासूनच मा.गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. १९४८ साली गांधीहत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले. त्याकाळात ते छान शर्ट, पॅंट, टाय लावून वावरत असायचे. त्यामुळे पोलिसांना संशय आला नाही.

हिस्लॉप कॉलेजमध्ये अध्यापन करत असताना मा.गो. वैद्य यांनी संघाशी असलेली निष्ठा कधीही लपविली नाही. इतकेच नव्हे तर १९५४-५५ साली प्राध्यापकांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवू नये किंवा निवडणुकीत भाग घेऊ नये, या सरकारी फतव्यावर तसा करार करण्याचे बाणेदारपणे नाकारले.

मा.गो. वैद्यांनी हिस्लॉप कॉलेज सोडल्यामुळे कॉलेजचे फार मोठे नुकसान झाले आहे असे कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य मोझेस म्हणाले. मात्र दुसरा कसलाही विचार न करता मा.गो. वैद्य हे १९६६मध्ये तरुण भारत या मराठी वृत्तपत्रात दाखल झाले.

१९७८ साली मा.गो. वैद्य महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.