Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर १६, २०२०

ऑगस्ट महिन्यात विदर्भातील वीज ग्राहकांकडून ५२४ कोटी रुपयांचा भरणा

MSEB Office, Nampur - Electricity Suppliers in Nashik - Justdial
चंद्रपूरमधून ५२ कोटी तर
गडचिरोलीमधून २३ कोटींचा भरणा
चंद्रपूर/खबरबात:
 महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत विदर्भातील घरगुती,वाणिज्यिक आणि औदयोगिक ग्राहकांनी लॉकडाउन नंतर नियमित वीज बिल भरण्यास सुरुवात केली असून ऑगस्ट महिन्यात विदर्भातील ५४ लाख ग्राहकांनी सुमारे ५२४ कोटी रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केला आहे.यात चंद्रपूर जिल्ह्यातील ४ लाख १९ हजार वीज ग्राहकांनी ५२ कोटी ५१ लाख रुपयांचा तर गडचिरोली जिल्ह्यातील ३ लाख ४८ हजार वीज ग्राहकांनी २३ कोटी ६३ लाख रुपयांचा भरणा केला. वीज बिल भरणाऱ्यात नागपूर परिमंडलातील ग्राहकांची संख्या सर्वाधिक असून सर्वात कमी ग्राहक अकोला परिमंडलातील आहेत.वीजग्राहकांनी महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर 'ऑनलाईन' पर्यांयाद्वारे वीजबिलांचा घरबसल्या भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मार्च महिन्यात लॉकडाउन लागल्यानंतर वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाली होती. अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर या पाच परिमंडलाचा समावेश असलेल्या नागपूर प्रादेशिक विभागात एप्रिल महिन्यात केवळ ३७ टक्के ग्राहकांनी वीज बिल भरले होते.मे महिन्यात ही टक्केवारी ३१ टक्क्यांपर्यंत घसरली आणि जून महिन्यात तर ती २५ टक्क्यापर्यंत खाली आली होती. मात्र त्यानंतर परिस्थिती सुधारली. ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार महावितरणने ग्राहकांना दिलासा देत ग्राहकांना बिलाचे हप्तेही पाडून दिले होते तसेच लॉकडाउन काळातील वीज बिलांचा एकत्रित भरणा केल्यास अशा ग्राहकांना 2 टक्के सवलत देण्यात आली होती. या काळात महावितरणकडून ग्राहकांशी प्रत्यक्ष तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क,ग्राहक मेळावे,वेबिनार,विशेष मदत कक्ष,लोकप्रतिनिधी व परिसरातील ग्राहकांसाठी माहिती देण्यासाठी व्हाट्स अँप ग्रुप तसेच ग्राहकांच्या मोबाईलवर एस.एम.एस, बिल तपासण्यासाठी वेब लिंक आणि वीज बिलवर बिलाची संपूर्ण माहिती इत्यादी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली.

संपूर्ण विदर्भाचा समावेश असलेल्या नागपूर प्रादेशिक विभागात ऑगस्ट महिन्यात ५४ लाख ग्राहकांनी सुमारे ५२४ कोटी रुपयांचे वीज बिल भरले. नागपूर परिमंडलातील १६ लाख ग्राहकांनी २४३ कोटी रुपये,चंद्रपूर परिमंडलातील ७ लाख ग्राहकांनी ७५ कोटी रुपये, गोंदिया परिमंडलातील ५ लाख ग्राहकांनी ५३ कोटी रुपये,अमरावती परिमंडलातील १२ लाख ग्राहकांनी ८६ कोटी रुपये तर अकोला परिमंडलातील ११ लाख ग्राहकांनी ६७ कोटी रुपयांचे वीज बिल भरले आहे.

वीज बिल भरण्यासाठी महावितरण ने ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईट व महावितरणच्या मोबाईल ॲपवर वीजबिल पाहण्याची व हे बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.वीजग्राहकांसाठी तयार केलेले मोबाईल ॲप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध आहे. या ॲपमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत. प्रामुख्याने एकाच खात्यातून ग्राहकांना स्वतःच्या अनेक वीजबिलांचा भरणा करण्याची सोय आहे.त्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच भरलेल्या पावतीचा तपशीलही वेबसाईट व ॲपवर उपलब्ध आहे.

क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीज बिल भरण्यासाठी 'ऑनलाईन'चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क आहेत. नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा 'ऑनलाईन' भरणा करण्यासाठी याआधी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून 'ऑनलाईन'द्वारे होणारा वीज बिल भरणा आता निःशुल्क आहे. तसेच 'ऑनलाईन' बिल भरण्यासाठी ०.२५ टक्के सूट दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत देण्यात येत आहे. या सर्व सुविधा लक्षात घेऊन लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर 'ऑनलाईन' पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.