Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट १७, २०२०

कोरोनाच्या वाढत्या रुग्णासोबतच तापाने फणफणली वाडी


साथीच्या आजाराची शक्यता: नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष,स्थानिक नागरीक धास्तावले 
नागपूर / अरुण कराळे (खबरबात)
सद्यस्थितीत सतत सुरू असलेला रिमझिम पाऊस,जागोजागी भरलेले पाण्याचे डबके व शहरात कोरोना रोगाने केलेला फैलाव या सर्व गोष्टींमुळे वाडी परिसरात व्हायरल तापाच्या रुग्णात वाढ होत असताना कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नगर परिषद गुंतलेल्यामुळे शहरातील इतर समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने मागील दोन वर्षीप्रमाणे डेंग्यू व इतर साथीचे रोग पुन्हा पसरण्याच्या भीतीने स्थानिक नागरिक धास्तावले आहे.
एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या वाडी ग्रामपंचायतचे रूपांतर नगर परिषदेत झाल्यावर साहजिकच नागरिकांच्या आशा-अपेक्षा पल्लवित झाल्या होत्या,शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होऊन गेल्या अनेक वर्षांपासून ग्राम पंचायत प्रशासनाला मिळणार अपुरा निधी व मोठा परिसर यामुळे तत्कालीन प्रशासनाला पाहिजे तसा विकास करता येत नव्हता.नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिकेचा कालखंड संपला असून त्या काळात सत्तेत असलेल्या पक्षाने झपाट्याने विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्नही केला,परंतु अजूनही अनेक मूलभूत समस्या जैसे थे असल्याने यापेक्षा ग्राम पंचायत बरी होती अशी म्हणायची वेळ नगर परिषद प्रशासनाने आणू नये.
नगर परिषद रचनेनुसार शहराची 25 वॉर्डात विभागणी करण्यात आली.आजच्या घडीला काही वॉर्ड सोडल्यास बहुतांश वॉर्डात विविध समस्या मागील पाच वर्षांच्या कालखंडातील जैसे थे आहे,यात प्रामुख्याने रस्त्यावर वाहत असलेले गटाराचे पाणी,रिकाम्या भुखंडावर साचलेले पाणी,शहरातील अंतर्गत रस्त्यात पडलेले मोठे खड्डे व त्यात भरलेल्या पाण्यात होणारी डासांची उत्पत्ती,सफाई कामगारांची अनियमितता,मोकाट गुरांचा हौदस,निवासी भागात गुरांचे गोठे व शेण यामुळे पसरलेली दुर्गंधी यामुळे अदृश्य स्वरूपात विविध साथीच्या आजाराची लागण व्हायला सुरुवात झाली आहे.
प्रशासनाने स्वच्छतेबाबत जागोजागी होर्डिंग,सूचना फलक व घंटागाडीच्या ध्वनी प्रक्षेपणाद्वारे जनजागृती यापलीकडे कोणतीही ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही.शहरात दिवसेंदिवस पसरत असलेला कोरोनाला रोखण्यासाठी कंबर कसली असली तरी वरील समस्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा शहर पुन्हा डेंग्यू व इतर साथीच्या आजाराच्या कचाट्यात सापडायला वेळ लागणार नाही?उपरोक्त समस्या सोडविण्यासाठी आमदार समीर मेघे यांनी स्थानिक प्रशासनाला सूचना देणे गरजेचे झाले.मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले शहरात चांगले काम करीत असताना त्यांच्याकडे कामठी नगर परिषदेचा अतिरिक्त कार्यभार दिल्याने पूर्णवेळ त्यांना लक्ष देता येत नाही.तर दुसरीकडे ज्या लोकप्रतिनिधीनी नगर परिषद सभागृहात पाच वर्षे घालविली त्यावेळी या समस्या सोडवण्यासाठी सर्व अधिकार असताना त्यांना त्यावेळी या समस्या दिसल्या नाहीत आता तेच सर्वच पक्षाचे माजी लोकप्रतिनिधी समस्यांचे निवेदन देतात हाही अफलातून प्रकार पहावयास मिळत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.