गडचिरोली : किराणा दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर नक्षल्यांनी गोळ्या झाडल्या. यात दुष्यंत नंदेश्वर( २६) पोलिस जवान शहीद झाला असून, दिनेश भोसले हा जवान जखमी झाला आहे. ही घटना आज
कोठी येथे पोलिस मदत केंद्र असून, त्यात दोन्ही जवान कार्यरत होते. ते आज सकाळी किराणा सामान आणण्यासाठी दुकानात गेले असता दबा धरुन बसलेल्या साध्या वेशभूषेतील दोन ते तीन नक्षल्यांनी दुष्यंत नंदेश्वर व दिनेश भोसले यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात दुष्यंत ठार झाला, तर दिनेश जखमी झाला. हे कृत्य नक्षल्यांच्या रॅपिड अॅक्शन टीमने केल्याचा अंदाज आहे. दुष्यंतचा मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोलीला आणण्यात आला असून, जखमी दिनेश भोसले यास नागपूरला हलविण्यात आले आहे. शहीद दुष्यंत नंदेश्वरला आज दुपारी साडेतीन वाजता पोलिस मुख्यालयाच्या पटांगणावर मानवंदना देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस विभागातर्फे देण्यात आली.
दु्ष्यंत नंदेश्वर हा गडचिरोली येथील रहिवासी होता. शहरातील गोकुळनगर परिसरातील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयासमोरील भागात तो कुटुंबीयांसह वास्तव्य करीत होता. तो अविवाहित होता. त्याचे वडील पंढरी नंदेश्वर हे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचे वाहनचालक होते. अलीकडेच त्यांचे धानोरा पंचायत समितीत स्थानांतरण झाले आहे.