तुकाराम मुंढे यांची कारकीर्द
नागपूर जिल्हा परिषदेवर 2008 साली तुकाराम मुंढे यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली. त्याच दिवशी त्यांनी शाळेला भेटी दिल्या आणि गैहजर शिक्षकांचं निलंबन केलं. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्टरांनाही निलंबित केलं.
सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यांना वाळू माफियांच्या रोषाचाही सामना करावा लागला. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री सोडून इतरांचं व्हीआयपी दर्शन बंद केलं.
नवी मुंबईत महापालिका आयुक्तपदी बदली झाली. नवी मुंबईत आल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली आणि तिथेच तुकाराम मुंढे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. नवी मुंबईतही त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला.
नवी मुंबईतून पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी बदली झाली. पुण्यात गेल्यानंतर त्यांनी तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलचा महसूल वाढवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली, नियम बदलले आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा दिल्या. पण पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे त्यांची कारकीर्द पुन्हा एकदा चर्चेत आली.
पुण्यातून तुकाराम मुंढे यांची बदली नाशिकला करण्यात आली. त्यानंतर नागपूर येथे मनपा आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. जानेवारी 2020 मध्ये तुकाराम मुंढे नागपुरात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांना तुकाराम मुंढे नागपुरात असणे पटत नसल्याने त्यांच्या बदली हालचालींना वेग येऊ लागला. मात्र ऐन वेळेतच कोरोना ने विळखा घातल्याने मुंढे यांची बदली लांबणीवर टाकण्यात आली मात्र अखेर सहा महिन्यातच मुंढे यांची परत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
नागपूरकरांची मुंढेंन कडून बरीच अपेक्षा होती पण वर्षभराच्या आताच त्यांची बदली करण्यात आली. नागरिक तुकाराम मुंढेंच्या कामाचं नेहमीच कौतुक करतात आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असतात. पण राजकारण्यांना त्यांचं एवढं वावडं का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.