"स्वहकृआ"ची अंमलबजावणी करणाऱ्या शासकीय यंत्रणा आणि स्थानिक संस्था, संघटना एकत्र येऊन करणार काम
चंद्रपूर(खबरबात):
चंद्रपूर स्वच्छ हवा कृती आराखड्याची (स्वहकृआ’ची) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका (सीसीएमसी) आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ (एमपिसिबी) यांच्या पुढाकाराने पर्यावरण तत्ज्ञ व स्थानिक संस्था, संघटनांना एकत्र करून स्टेअरिंग कमिटीची स्थापना केली जाणार आहे.
केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्राच्या १८ शहरांतील हवा निकृष्ट दर्जाची असल्याचे सांगत त्यांना नॉन-अटेनमेंट म्हणजेच लक्ष्ये न गाठलेली शहरे म्हणून घोषित केले आहे. एमपीसीबीच्या एअर क्वॉलिटी स्टेटस रीपोर्ट २०१८-१९ नुसार चंद्रपूरच्या हवेचा दर्जा सर्वात खराब असल्याचे समोर आले आहे.
महापालिका आयुक्त श्री. राजेश मोहिते यांनी हवा प्रदूषणासारख्या गंभीर प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे त्यासाठी स्वछ हवा कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासठी ‘वन अम्रेला’ पॉलिसि तयार करून सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक संस्था, संघटनांना एकत्र घेऊन या प्रश्नावर निर्णायक तोडगा काढण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका पुढाकार घेऊन यशस्वी प्रयत्न करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ते इको-प्रो, कौन्सिल फॉर एनर्जी, एन्व्हायर्न्मेंट अॅण्ड वॉटर (सीईईडब्ल्यू) आणि वातावरण फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कोविड-१९ नंतर चंद्रपूर शहराची हवा वर्षभर ६०* या विषयवार बोलत होते
चंद्रपूर शहरामध्ये हवा प्रदूषणाच्या अन्य स्रोतांपैकी घरगुती कामांसाठी कोळसा सर्रास जाळला जातो. आणि त्याने प्रदूषणाबरोबर लोकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर होतो. त्यामुळे यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही देखील केली जाईल. तसेच रेव्हेन्यू डिपार्टमेंटशी बोलून लोकांना गॅस कानेक्शन्स उपलब्ध करून देण्याचे यशस्वी प्रयत्न करणार असल्याचे हि त्यांनी यावेळी सांगितले.
चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राजेश मोहिते यांच्यासोबतच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी श्री. अशोक करे, सीईईडब्ल्यूज्या प्रोग्राम असोसिएट श्रीम. तनुश्री गांगुली, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. मधुसुदन रुंगठा, पर्यावरणतज्ञ श्री. सुरेश चोपणे, पर्यावरण विश्लेषक प्रा. योगेश दुधपचारे, इको-प्रोचे संस्थापक बंडू धोत्रे आणि पत्रकार मजहर अली हे देखील या चर्चासत्रात सहभागी झाले होते.
सीईईडब्ल्यूच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात देशभरातील १०२ शहरांच्या ‘स्वहकृआ’चे विश्लेषण करण्यात आले आहे. या अहवालात चंद्रपूरचा हि समावेश आहे. संशोधक आणि या अहवालाच्या सहलेखिका श्रीम. तनुश्री गांगुली यांच्या मते, आम्ही अभ्यास केलेल्या इतर शहरांच्या तुलनेत चंद्रपूरच्या धोरणांमध्ये उत्सर्जनाच्या स्रोतांचीही माहिती देण्यात आली आहे. मात्र, प्रदुषण कमी करण्यासाठीच्या प्रस्तावित उपाययोजनांसाठीच्या आर्थिक तरतुदींचा यात समावेश नाही.
"शिवाय, चंद्रपूरच्या आराखड्यात नमूद करण्यात आलेल्या ३५ टक्के उपाययोजना उद्योग आणि ऊर्जा प्रकल्पांतील उत्सर्जनावर भर देतात. या धोरणातील ८५ टक्के कृतींच्या अमलबजावणीसाठी वर्षभरापेक्षा कमी कालावधी देण्यात आला आहे," असे त्या म्हणाल्या. यात जबाबदार असलेल्या सर्व घटकांच्या प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रगती अहवालाची पद्धती संस्थात्मक असाव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
सीईईडब्ल्यूच्या अभ्यासानुसार चंद्रपूरच्या स्वच्छ हवा कृती योजनेत एमपीसीबी आणि सीसीएमसीचा अनुक्रमे ३५ आणि ४० टक्के वाटा आहे.
पर्यावरण विश्लेषक प्रा. योगेश दुधपाचरे यांनी नमूद केले की नागरिक २००६ पासून हा मुद्दा मांडत आहेत आणि उद्योगांमुळे होणाऱ्या प्रदुषणासंदर्भात ठोस कारवाई करत हवेचे प्रदुषण नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी एमपीसीबीला विनंती करत आहेत.
"हवा प्रदुषणासारख्या गंभीर प्रश्नाकडे आजपर्यंत सातत्याने दुर्लक्ष झाल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. चंद्रपूरच्या हवेची ढासळलेली गुणवत्ता व लोकसंख्येचे प्रमाण पाहता हवेचा दर्जा मोजणारी फक्त दोन केंद्रे आहेत, जी अर्थातच पुरेशी नाहीत." असे सांगत चंद्रपूरसाठी हवेच्या गुणवत्तेची पडताळणी करणाऱ्या अजून नवीन केंद्रांची उभारणी करण्याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले.
एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी श्री. अशोक करे यांनी स्पष्ट केले की चंद्रपूरसाठी हवेचा दर्जा नियंत्रित करणारी सहा नवी केंद्रे प्रस्तावित आहे आणि त्यासाठीचे करार लवकरच केले जातील.
हवा प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही "पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या आदेशानुसार आम्ही सर्व औष्णिक केंद्रांना फ्ल्यू गॅस डीसल्फराइजर्स (एफजीडी) लागू होणार असून हे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल," असे ते म्हणाले.
पर्यावरणतज्ज्ञ श्री. सुरेश चोपणे यांनी हवा प्रदूषणावर मात करण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागात एन्व्हायर्नमेंटल सेल निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. या चर्चे नंतर पुनः काही दिवसांनी प्रगती अहवालासंदर्भात सर्वांनी एकत्र येण्याची इच्छा मा. आयुक्त राजेश मोहिते यांनी वर्तवली.
ईको-प्रोचे संस्थापक श्री. बंडू धोतरे यांनी सांगितले की चंद्रपूरच्या नागरिकांमध्ये वायू प्रदुषणाच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल अधिक जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे.