प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या यशाचा आनंद मोठा, भावी वाटचालीसही शुभेच्छा
मुंबई, दि. 29:- दहावीची परीक्षा शिक्षणाच्या वाटचालीतील एक टप्पा आहे. या टप्प्यावर प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या यशाचा आनंद निश्चित मोठा असतो. त्यासाठी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी अभिनंदन संदेशात म्हटले आहे की, कोणत्याही वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा असतो. तशी ही दहावीची परीक्षा एक टप्पा आहे. त्यामध्ये क्षमता सिद्ध करण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक प्रय़त्न करता. अशा प्रय़त्नपुर्वक मिळवलेल्या यशाचा आनंद हा निश्चितच मोठा असतो. त्यामुळे या प्रयत्नांसाठी आणि यशासाठी तुमचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच भावी वाटचालीसाठीही शुभेच्छा.
काहींना या परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नसेलही. त्यांनी आणखी प्रयत्न करावेत. यश तुमचेच असेल, गरज असेल, ती फक्त आणखी जोमाने प्रयत्न करण्याची. त्यासाठीही शुभेच्छा. निकाल काहीही असेल तो आनंदाने स्वीकारा. शिक्षणाने आपण समाजाचा, देशाचा विकास घडवून आणू शकतो. त्यासाठी कटीबद्ध राहूया.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई, दि. 29 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता, यशस्वी होण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावेत, पालकांनीही निराश न होता मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
दहावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. करिअरची दिशा ठरवून त्यादृष्टीने पाऊल टाकण्याची ही पहिली संधी असते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात प्रवेश घेताना आवडीची शाखा निवडावी.
पालकांनीही मुलांचा कल ओळखून त्यांच्यावर सक्ती न करता त्यांना आवडीचा अभ्यासक्रम निवडण्यासाठी प्रोत्साहित करावे, शैक्षणिक प्रगतीबरोबरच कौशल्यविकास, खेळ-व्यायाम, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने यश खेचून आणले पाहिजे. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर प्रगतीची दारे बंद होत नाहीत. प्रगतीची दारे खुली करण्याची हिम्मत असली पाहिजे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवतील त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थीही जिद्दीने प्रगती करतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.