▪️अॅड. पारोमिता गोस्वामी यांची मागणी
▪️जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना पाठविले निवेदन
चंद्रपूर : लॉकडाऊनमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना घरापर्यंत सुखरूप पोहोचविण्याची सुविधा करून देण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या नेत्या अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वङेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, माजी अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, सुभाष धोटे, किर्तीकुमार भांगडिया, सौ. प्रतीभा धानोरकर यांना निवेदन पाठविले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभिड, गोंडपिपरी तालुक्यातील 13000 च्यावर मजूर चंद्रपूर जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा तसेच आंध्र प्रदेश राज्यात मिरची कटाई करिता स्थलांतरित झालेले आहे. या मजुरात मोठ्या प्रमाणावर महिला मजुरांचाही समावेश आहे.
कोरोनाचा उद्रेक वाढू नये, याकरिता केंद्र शासनाने देशभर लाॅकडावून जाहीर केले आणि सर्वांनी आहे तिथेच सुरक्षित रहावे असे जाहीर केले. यामुळे हे मजूर आंध्र व तेलंगनातच अडकलेले आहे.
या मजुरांनी परतीसाठी खूप प्रयत्न केले, विनंती केली. मात्र त्यांना परत येता येत नसल्यामुळे अनेक सामाजिक व इतर समस्या निर्माण झालेल्या आहेत.
केंद्र शासनाने स्थलांतरित मजुराच्या संदर्भात, त्या-त्या राज्याने या मजुरांची व्यवस्था करावी असे आदेश दिले असले तरी, तेलंगणा व आंध्र सरकारने या मजुरांना वीस दिवसापूर्वी केवळ तांदूळ, आटा आणि तीन शे ते पाचशे रुपये अशी मदत दिलेली आहे. ही मदत देखील पुरेशी नाही आणि सर्वांनाच मिळाली असेही नाही. राहण्याची कोणतीच सुविधा नसल्याने बरेचसे मजूर शेतातच उघड्यावर राहत आहे. आणि त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झालेला आहे.
अनेक स्थलांतरित मजुरांचे लहान-लहान मुले गावात आहेत. वृद्ध माता-पिता गावात आहेत.
उपरी (तहसील सावली) येथील नरेंद्र पेंडलवार नामक इसम मरण पावला. त्याची पत्नी ही तेलंगणा अडकली असल्याने तिला आपल्या पतीचे अंत्यदर्शन घेता आले नाही. घरी दोन मुले आहेत. वडिल मरण पावले, आणि आई तेलंगणात अडकली आहे अशा भयानक परिस्थितीत त्यांना जीवन जगावे लागत आहे, हे चित्र अत्यंत क्लेशदायक आहे.
देशात सध्या कोरोणामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सर्वांना आपल्या घरी कुटुंबात रहावे अशी भावना निर्माण होणे सहाजिकच आहे. आणि यामुळेच अनेक मजूर शेकडो किलोमीटर पायी चालत आपल्या गावाकडे निघालेले आहे आणि यातले बरेचसे मजूर रस्त्यात मृत पावल्या च्या बातम्या आहेत. काही घरी आल्यानंतरही मृत झाल्याचे वृत्त सर्वत्र प्रकाशित होत आहेत.
लाॅकडावून नेमके कधी संपेल? याची कोणतीही शाश्वती नाही. पाऊस आणि वादळ सुरू झालेले आहेत. आता शेतीचा हंगामही सुरू होत आहे अशा परिस्थितीत परराज्यात कोणतेही काम न करता असुरक्षित उघड्यावर राहणे ही बाब स्थलांतरित मजूरासाठी अतिशय वेदनादायी आणि भितीची आहे.
नुकतेच उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना मध्य प्रदेशातील कोटा येथून विशेष बसेस पाठवून आपल्या स्वगावी पोहोचले आहे. तसे वृत्त सर्वत्र प्रकाशित झाल्याने मजुरांनाही घराकडे परतीची आशा निर्माण झाली आहे.
मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केले असता त्यांनी सांगितले की केंद्र सरकारचे गृह मंत्रालयाची परवानगीशिवाय दुसऱ्या राज्यातून लोकांना आणता येणार नाही. आपण कृपया केंद्र सरकार (गृह मंत्रालय) यांचेशी संपर्क साधून आपल्या जिल्ह्यातील मजुरांना गावापर्यंत सुरक्षित आणण्याचे दृष्टीने सहकार्य करावे अशी विनंती अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासनाकङे केली आहे.