करोनाच्या या संक्रमण काळात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर उदरनिर्वाह करणा-या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचा प्रश्न गंभीर झाला आहे. सरकार व विविध संघटना आपापल्या परीने त्यांना अन्न-धान्य व इतर मदत पोहचविण्याचे कार्य करीत आहेतच मात्र अश्या बालकांना केवळ तात्पुरती मदतच नाही तर त्यांचा दीर्घकाळ सर्वांगीण विकास महत्वाचा आहे.
कायद्याने काळजी आणि संरक्षणाची गरज असलेले बालक आढळल्यास प्रत्येक जिल्ह्यात चाईल्ड लाईन १०९८, जिल्हा बालसंरक्षण कक्ष, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी याशिवाय प्रत्येक पोलीस स्टेशनला असलेल्या बाल पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन बाल कल्याण समिती, नागपूरच्या सदस्या डॉ ऍड अंजली साळवे यांनी केले आहे.
मागिल काही दिवसांपुर्वी पाच बालकांना मदतीची गरज असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. अनेकांनी त्या व्हिडीओबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या. अनेक सामाजिक संघटना, राजकीय नेते, शासकीय यंत्रणा त्याठिकाणी एकत्र आले आणि त्या बालकांना तात्पुरता आधार देण्याचे काम केले.
मात्र, हे सर्व होत असताना ही पाचही बालके प्रथमदर्शनी जे. जे. ऍक्ट २०१५ नुसार काळजी आणि संरक्षणाची आहेत असे लक्षात येताच त्या मुलांना भविष्यात भेडसावणारे प्रश्न नेमके कसे हाताळायचे आणि यंत्रणेच्या माध्यमातून भविष्यात त्या मुलांचे कश्या प्रकारे पुनर्वसन करायचं यासाठी नागपूर बाल कल्याण समिती सदस्या डॉ ऍड अंजली साळवे यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षासोबत संपर्कात राहून वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देत त्या बालकांना जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फ़त बालगृहात दाखल करेपर्यंत व त्यानंतर त्या बालकांसोबत आपुलकीने संवाद साधून त्यांना विश्वासात घेतले.
महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी, बालसंरक्षण अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी आपले कर्तव्य फार चांगल्या प्रकारे पार पाडले यासाठी डॉ. साळवे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या बालकांच्या निमित्याने समाजाला कायदेशीर बाजू माहीती होणे गरजेचे आहे, अशी बालके आढळली तर कायद्याने कार्यरत असलेल्या यंत्रणेची माहिती जनसामान्यापर्यंत पोहचणे आवश्यक आहे.
या बालकांबाबत आता पुढील निर्णय समिती मिळून घेईल अशी माहिती डॉ. साळवे यांनी दिली. बाल कल्याण समितीचे सदस्य डॉ. रविंद्र गुंडलवार यांनी सांगितले की, डॉ. साळवे यांच्या कायदेशीर ज्ञानाचा लाभ बालकल्याण समितीमध्ये काम करतांना आम्हाला होतो तर समितीचे दुसरे सदस्य श्री संजय पवार म्हणाले की, डॉ. साळवे यांच्या महिला व बालविकास क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे बालकांसोबत त्या अगदी सहजपणे संवाद साधतात, या प्रकरणातही डॉ साळवे यांनी योग्य समन्वय साधत आपली भूमिका अगदी योग्य प्रकारे पार पाडली, डॉ. साळवे यांनी बालकल्याण समिती नागपूरचे सदस्यपद स्विकारल्यानंतर बालकांचा सामाजिक तपासणी अहवाल, लैगिक शोषणातील बालकासाठी साहाय्यक व्यक्ती नेमणे अश्या अनेक कायदेशीर बाबीवर प्रकाश टाकला.
याचसोबत त्यांनी नागपूर बालकल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था तसेच महिला व बाल कल्याण विभागाने कायद्याच्या चौकटीत काम करावे, ही त्यांची आग्रही भुमिका नेहमीच असते. या बालकांच्या बाबतीत आता पुढील निर्णय समिती मिळून घेईल, असेही श्री संजय पवार यांनी सांगितले.