उपोषणाचा आज 7 वा दिवस
चंद्रपूर-
चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषद चंद्रपूर समोर 10 फेब्रुवारी पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे आज आंदोलनाचा सातवा दिवस आहे.
उपोषणाच्या सहाव्या दिवशी विविध शिक्षक संघटना नेते दुशांत निमकर, निलेश कुमरे, नगाजी साळवे, जयदास सांगोडे यांनी आंदोलन मंडपाला भेट दिली.
काल पुरोगामी च्या ब्रम्हपुरी तालुका शाखेच्या वतीने रामेश्वर सेलोटे, पुष्पाकर बांगरे, भाऊराव कावळे, सोमेश्वर खरकाटे, रामकृष्ण चौधरी, पुरुषोत्तम बांगरे, विनोद मदनकर हे शिक्षक साखळी उपोषण आंदोलनाला बसले होते.
10 फेब्रुवारी पासून आंदोलन सुरू आहे मात्र पत्राद्वारे समस्या सोडवू या आश्वासनाशिवाय आंदोलन मिटवण्यासाठी अजूनही ठोस पाऊल प्रशासनाने उचलले नाही, आज साखळी उपोषणाचे सहा दिवस लोटूनही प्रमुख समस्या न सोडवल्याने जिल्ह्यातील शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे, शिक्षण विभागाला शिक्षकांच्या समस्यांची काळजी नाही हेच यावरून दिसून येते.
आदिवासी भागातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी, प्राथमिक व पदवीधर शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी तसेच प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षकाना निवड श्रेणी यासह प्राथमिक शिक्षकांच्या एकूण 12 समस्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे, यापैकी शिक्षण विभागात टोकन पद्धती लागू केली मात्र वित्त विभागात ती अजूनही लावली नाही, अन्य समस्या बाबत माहिती मागणे सुरू आहे, अन्य विभागाला पत्र दिले आहे अश्या प्रकारची उत्तरे प्रशासनाने संघटनेला दिली आहेत
मात्र मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या हस्तक्षेपाशिवाय प्रमुख समस्या सुटणे अशक्य आहेत. जिल्ह्यातील अनेक शिक्षकांच्या वेगवेगळ्या समस्या शिक्षण, वित्त व आरोग्य विभागात प्रलंबित आहेत वर्ष-वर्ष मेडिकल बिलाला हात लावला जात नाही, एकच विभाग एकाच फाईल वर एकापेक्षा जास्त वेळा त्रुटी काढून परत करत आहेत, फाईल मागे पुढे करत लिपिक वर्गाची दादागिरी वाढली आहे
मात्र अधिकाऱ्यांचे याकडे फारसे लक्ष नाही संघटनेने लक्षात आणून दिल्यावरही कारवाई होतांना दिसत नाही त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षक आंदोलन मंडपाला भेटी देऊन आपले गाऱ्हाणे संघटनेपुढे मांडत आहेत. आंदोलनाचे नेतृत्व विजय भोगेकर, हरीश ससनकर, अल्का ठाकरे, रवी सोयाम, निखिल तांबोळी, हे पदाधिकारी करत आहेत उद्या सिंदेवाही तालुक्यातील शिक्षक उपोषणाला बसणार आहेत.