सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अल्पसंख्यांक महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम होण्याची दिशा मिळाली – परवीन मोमीन
अल्पसंख्यांक समाजातील महिला सक्षम व्हाव्या व त्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या यादृष्टीने बचतगटांची निर्मीती करून ही चळवळ आपण अधिक गतीमान करीत आहोत. गेल्या 5 वर्षात महिलांच्या कल्याणासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण महिलांचा जीवनस्तर उंचावत त्यांच्या उद्यमशिलतेला वाव देत प्रगतीचा नविन टप्पा त्यांच्या आयुष्यात यावा यासाठी नवतेजस्विनी योजना राबविण्याचा निर्णय आम्ही घेतला. या माध्यमातुन राज्यातील 5 लक्ष बचतगटांची चळवळ अधिक गतीमान होणार असून बचतगटातील महिलांची कायदेविषयक, सामाजिक, आर्थीक ज्ञानाबाबत जनजागृती करण्याकरिता महिला आयोगामार्फत नविन प्रज्वला योजना राबविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अल्पसंख्यांक समाजातील भगिनींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत व राहू असे प्रतिपादन अर्थमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 6 ऑक्टोबर रोजी चंद्रपूरात भाजपा अल्पसंख्यांक आघाडीच्या पदाधिका-यांच्या झालेल्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी राजुरा येथील महायुतीचे उमेदवार आ. संजय धोटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, श्रीमती परवीन मोमीन, जिल्हा परिषद सदस्या रोशनी खान, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, भाजपा नेते प्रमोद कडू आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या योजनांच्या माध्यमातुन विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता, दिव्यांग महिलांना मिळणा-या अनुदानाच्या रकमेत 600 रू. हून 1000 रू. इतकी वाढ करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता महिलांना आधार देत त्यांना स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनविण्यासाठी स्वयंरोजगाराची योजना तयार करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या मानधनात तसेच भाऊबीज भेट रकमेत वाढ करण्याचा निर्णय असो वा विधवा महिलेने पुनर्विवाह केल्यानंतर मय्यत पतीची पेंशन तिला लागू करण्याचा निर्णय असो नेहमीच महिलांच्या कल्याणाचा विचार आम्ही केला आहे. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यास बचतगटांची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी बोलताना श्रीमती परवीन मोमीन म्हणाल्या, सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व मदतीने अल्पसंख्यांक समाजातील महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम होण्याची दिशा मिळाली आहे. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनातुन बचतगटांची नोंदणी करण्यात आली असून या महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने नवी वाट गवसल्याचे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
या बैठकीला भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे पदाधिकारी तसेच अल्पसंख्यांक बचतगटांच्या प्रतिनिधींची मोठया संख्येने उपस्थिती होती.