Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर १३, २०१९

वीजबिल भरतांना संगणकीकृत पावत्याच स्वीकारा;महावितरणचे ग्राहकांना आवाहन


बुटीबोरी व कॉग्रेसनगर विभागात 
पावत्यांमध्ये अंशतः बदल
नागपूर/प्रतिनिधी:
ग्राहकांनी केलेला वीजबिलाचा भरणा अचूक, वेळेत व त्यांच्या खात्यावर समायोजित व्हावा यासाठी महावितरणकडून ग्राहकांना संगणकीकृत पावत्या देण्यात येतात. मुंबई व परिसरातील महावितरणच्या ग्राहकांना संगणकीकृत पावत्या छापील कागदाऐवजी (प्रिप्रिंटेड) कोऱ्या कागदावर छापून देण्याचा उपक्रम एप्रिल-२०१९ पासून राबविण्यात येत आहे. आता हा उपक्रम नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी आणि कॉगेसनगरसह राज्यातील आणखी २५ शहरी विभागांमध्ये येत्या सोमवारपासून (१६ सप्टेंबर) अंमलात येणार असून संबंधित ग्राहकांनी अशा पावतीवर संगणकीकृत क्रमांक असल्याची खात्री करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

कल्याण आणि भांडुप परिमंडलातील ठाणे, वाशी, कल्याण-१ व २, वसई या मंडल कार्यालयांतर्गत येणाऱ्या ग्राहकांना वीजबिल भरणा केंद्रातून छापील कागदाऐवजी कोऱ्या कागदावर संगणकीकृत क्रमांकासह पावत्या छापून देण्यास १ एप्रिल २०१९ पासून सुरुवात झाली. 

आता नागपूर जिल्ह्यातील कॉग्रेसनगर आणि बुटीबोरी विभागासह नाशिक शहर एक आणि दोन, मालेगाव, औरंगाबाद शहर एक आणि दोन, भुसावळ, जळगाव शहर, नांदेड, अकोला शहर, अमरावती शहर, सोलापूर शहर, इचलकरंजी, कोल्हापूर शहर, सांगली शहर, भोसरी, कोथरूड, पिंपरी, शिवाजीनगर, रास्तापेठ मंडलातील बंडगार्डन, नगर, पर्वती, पद्मावती, रास्तापेठ या २५ विभागांमध्ये वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांना संगणकीकृत क्रमांक असणाऱ्या पावत्या कोऱ्या कागदावर छापून देण्यात येणार आहेत.

 ग्राहकांना हा संगणकीकृत क्रमांक वापरून महावितरणचे संकेतस्थळ किंवा मोबाईल अँपवर (app) वीजबिल भरल्याची खात्री करता येईल. त्यामुळे ग्राहकांनी भरणा पावतीवर संगणकीकृत क्रमांक असल्याची खातरजमा करावी व संगणकीकृत पावतीशिवाय वीजबिल भरू नये. तसेच फसवणूक टाळण्यासाठी हस्तलिखित पावत्या नाकाराव्यात व यासंदर्भात नजीकच्या महावितरण कार्यालयाला माहिती द्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. 

ग्राहकांना विविध सेवा-सुविधा सुलभ व सुरक्षित पद्धतीने मिळाव्यात यासाठी महावितरणकडून सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणने आपली सर्व वीजबिल भरणा केंद्र (पोस्ट ऑफिस वगळून) केंद्रीकृत संगणकीय प्रणालीवर आणली आहेत. यातून ग्राहकांनी केलेला वीजबिलाचा भरणा अचूक व त्वरित समायोजित होतो. 

महावितरणने वीजबिलासह सर्व प्रकारच्या शुल्काचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in हे संकेतस्थळ, मोबाईल अँप (app), महापॉवर पे यासारखे विविध पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत. वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करणाऱ्या ग्राहकांना बिलाच्या रकमेत ०.२५ टक्के सूट देण्यात येते. तरी अधिकाधिक ग्राहकांनी ऑनलाईन बिल भरणा सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.