Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट ०२, २०१९

चंद्रपूर मधील ३ धरणात 100 टक्के जलसाठा

पूरस्थिती नियंत्रणासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 विदर्भात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकरीराजा सुखावला असून जिल्ह्यातील जलसाठ्यामध्ये मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. वरोरा तालुक्यातील चदई, चारगाव व लभानसराड धरण 100 टक्के भरले असून सर्वांचे लक्ष असलेले इरई धरण पन्नास टक्के भरलेले आहे. सध्या जिल्ह्यात कोठेच पूरपरिस्थिती निर्माण झालेली नसून पूरपरिस्थितीच्या व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने पोलीस विभाग, अग्निशामन दल व आपत्ती निवारण कक्ष यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज केली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी जितेश सुरवाडे यांनी दिली.

सर्व धरणे सुस्थितीत
जिल्ह्यात अनेक मोठे व मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये सिंदेवाही तालुक्यातील आसोलामेंढा, नलेश्वर, नागभीड तालुक्यातील घोडाझरी, वरोरा तालुक्यातील चदई, चारगाव व लभानसराड, राजुरा तालुक्यातील अमलनाला व डोंगरगाव, तर कोरपना तालुक्यातील पगडीगुद्दम या धरणाचा प्रामुख्याने समावेश होतो. यातील आसोला मेंढा धरण 50%, घोडाझरी 15 टक्के, डोंगरगाव 53% तर इरई धरण 50% भरलेले आहे. आज पर्यंत जिल्ह्यात सरासरी 461 मिमी एवढे पर्जन्यमान झाले आहे. तर 2018 मध्ये आजच्या दिवशी सरासरी 643 मिमी एवढे पर्जन्यमान झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याने मोठी दुर्घटना झाली होती. त्यादृष्टीने धरणाच्या रचनेचे शास्त्रीयदृष्ट्या निरीक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील धरणे सुस्थितीत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची सद्यस्थिती
जिल्ह्यात वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, अंधारी या नद्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. सद्यस्थितीत यापैकी कोणत्याही नद्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली नसून चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वर्धा जिल्ह्यातील कोरा येथील लाल नाला प्रकल्प 100% जलसाठा भरल्यामुळे या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा नदीच्या जलपात्रात वाढ होऊ शकते. तसेच वरोरा तालुक्यातील चारगाव धरण शंभर टक्के भरल्यामुळे इरई नदीच्या पात्रात पाणी वाहून इरई धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ शकते. मध्यप्रदेशातील राजीव सागर या प्रकल्पांमधील जलसाठा वाढल्यास वैनगंगा नदीच्या जलपात्रात वाढून गोसेखुर्द प्रकल्पाचा जलसाठा वाढू शकतो व चंद्रपूर जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे जलपात्र वाढू शकते.
1077 क्रमांकावर आपत्ती नियंत्रण कक्षाशी साधा संपर्क
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून यामध्ये डब्लूसीएल व सीटीपीएस येथील आपत्ती नियंत्रणासाठी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे शोध व बचाव पथक तयार करण्यात आले आहे. तसेच शासनाचे अग्निशमन दल, पोलिस विभागाचे शोध व बचाव पथक आपत्ती नियंत्रण कक्ष सोबत समन्वयाने आपत्ती व्यवस्थापनाचे काम करणार आहे. या नियंत्रण कक्षामार्फत 40 एचपी इंजिन असलेल्या दोन बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध या बोटी वाहतूक करू शकतात. 

या बोटींची मुंबई येथील तांत्रिक निरीक्षकाकडून यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याला आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या बोटीसोबतच अस्का लाईटव्यवस्था, मेगाफोन, वूडनकटर, टेंट, रेनकोट तसेच इतर आवश्यक सर्व साहित्य सज्ज करण्यात आले आहे. तरी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ 1077 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.